

ठाणे : शशी सावंत : कोकणच्या पर्यटनाचा आलेख गेल्या दहा वर्षांत तिपटीने उंचावला आहे. दहा लाखांवरून २५ लाखांपर्यंत पर्यटक हे सागरी पर्यटन करीत आहेत. पालघर ते सिंधुदुर्ग अशा कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये गडकोट किल्ले आणि पांढऱ्याशुभ्र वाळूचे किनारे यामुळे कोकणच्या किनारपट्टीला पर्यटकांची साथ मिळत आहे. ७२० किलोमीटरच्या या महाराष्ट्रातील किनारपट्टीवर आता या सागरी पर्यटनाला जलपरीची साथ लाभणार आहे. त्यामुळे हे पर्यटन आणखी विस्तारण्यास मदत होणार आहे. किल्ल्यांच्या भेटीसाठी मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून क्रूझ सेवा सुरू होणार आहे.
सध्या भाऊचा धक्का ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते नवी मुंबई रो-रो सेवा सुरू झाली आहे. या माध्यमातून पर्यटन बहरात असताना आता नव्या क्रूझ सेवेमुळे पर्यटनाला आणखी भरारी मिळणार आहे. पूर्वी मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक सुरू होती. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करत होते. १९६२ नंतर या सेवेला घरघर लागली. आता पुन्हा एकदा ही अत्याधुनिक क्रूझ सेवा कोकण किनारपट्टीवर सुरू होत आहे. कोकणातील गडकोट किल्ल्यांना शिलाहार, राजा भोज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पुरातन राजे राजवाड्यांचा मोठा इतिहास आहे. हे पुरातन किल्ले पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. कोकणभूमीची निर्मिती परशुरामाने केल्याचा इतिहास सांगितला जातो. तेव्हापासूनचा हा ऐतिहासिक आणि पुरातन ठेवा मंदिरे, गडकोट यांच्या रूपाने पहायला मिळत आहे. क्रूझ सेवेचे नवे टप्पे जाहीर करण्यात आले असून यामध्ये मुंबई-मुरूड, मुंबई – दापोली हर्णे, मुंबई- रत्नागिरी, मुंबई – विजयदुर्ग, मुंबई- वेंगुर्ले, मुंबई-गोवा अशा माध्यमातून समुद्रसफारी होणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी अशा सेवा काही प्रमाणात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचे सातत्य राहिले नाही. आता कोकण किनारपट्टीवर या सेवा सुरू होणार आहेत. त्याबरोबर भाईंदर बांद्रा, ठाणे-वसई अशा जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. क्रूझ सेवेमध्ये पंचतारांकित सुविधा असल्याने परदेशी पर्यटकांसाठी या सफारी आकर्षण ठरणार आहेत. देशी-विदेशी पर्यटक सकाळी ६ वाजता मुंबईवरून निघाले तर ते मुरुडला दहा वाजेपर्यंत पोहोचतील. मुरुड येथे किल्ले जंजिरा हा सिद्धीचा किल्ला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला आणि स्वच्छ असे मुरुड, आगरदांडा समुद्र किनारे अशा पर्यटन स्थळांवर पर्यटकांना नेले जाणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळात रायगडचे पर्यटन होऊ शकेल. रायगडला जाणारे क्रूझ हे दिघी बंदरात थांबविण्यात येणार आहे. तेथून फेरी बोटीद्वारे मुरुड जंजिरा किल्ला दाखविण्यात येईल. दुपारपर्यंत किल्ला पाहिल्यानंतर पद्मदुर्ग किल्ला दाखविण्यात येईल. त्यानंतर मुरुड बीच दाखविण्यात येईल. त्यांनतर साडेसहा वाजता दिगी बंदरात फेरी बोटीद्वारे पुन्हा क्रूझकडे सोडले जाईल.
सध्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिसवरून मुंबई ते गोवा, मुंबई ते लक्षद्वीप आणि मुंबई ते कोचीदरम्यान कार्डिलिया क्रूझची सेवा सुरू आहे. पर्यटकांचा प्रतिसादसुद्धा चांगला मिळतो आहे. एकूण ११ पॅसेंजर डेक आणि ७९६ केबिन्स असलेल्या या भव्य कार्डिलिया क्रूझमध्ये एकाच वेळी १ हजार ८४० हून अधिक पाहुण्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. कार्डिलिया क्रूझचे तिकीट २२ हजारांपासून ५६ हजारांपर्यंत आहे.
मुंबई – अलिबाग प्रवास आणखी सुपरफास्ट; आशियातील पहिली हायस्पीड क्रूझ लवकरच सेवेत
आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीला रायगड जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडणार आहे. येथे आशियातील पहिली भारतीय हायस्पीड क्राफ्ट रो- पेक्स क्रूझ सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये, मुंबईहून काशीद – दिघी अशी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कोकण गौरव क्रूझ सेवेची घोषणा मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली आहे.