

जिला फुलाप्रमाणे जपले पाहिजे, तिचे संरक्षण केले पाहिजे त्या उमलत्या कळीला कुस्करून टाकणाऱ्या वासनांध नराधमाचे राक्षसी कृत्य सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरी डोंबिवली मध्ये चव्हाट्यावर आले आहे. आठ महिन्यांच्या तान्हुल्या बाळाला दारू पाजणाऱ्या आणि पोटच्या 9 वर्षीय गोळ्याला वासनेची शिकार करणाऱ्या या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकून गजाआड केले आहे.
पश्चिम डोंबिवलीतील एका सोसायटीत राहणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेने आपल्या पतीच्या विरोधात पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर वासनांध जन्मदात्याचे काळेकृत्य उघडकीस आले. या घटनेनंतर हे दाम्पत्य राहत असलेल्या परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 39 वर्षीय आरोपी हा 30 वर्षीय पत्नीसह राहतो. या दाम्पत्याला एक 9 वर्षांची, तर दुसरी 8 महिन्यांची अशा दोन मुली आहेत. ऑक्टोबर महिन्यात ही महिला मोठ्या मुलीला घरी ठेवून आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन काही कामानिमित्त गावी गेली होती. पित्यातील वासनांध राक्षस जागा झाला. मुलीला अंघोळ घालण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. गावाहून परतल्यानंतर मुलगी भयभीत झाल्याचे दिसून आले.
मुलीने आपल्या पित्याने केलेले दुष्कृत्य केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. आईने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मुलगी सतत रडत असल्याचे पाहून आईने तिला विश्वासात घेऊन नक्की काय घडले याची विचारणा केली. त्यानंतर मात्र मुलीने तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाचा उलगडा केल्यानंतर आई देखील भयचकित झाली. पतीला घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला असता मुलगी लहान आहे, असे सांगून त्याने पत्नीलाच धमकी देऊन गप्प केले.
मात्र आपल्या पतीची दुष्ट छाया मुलींवर पडली आहे, भविष्यात आपल्यासह मुलींच्या जिवालाही धोका संभवतो. वेळीच सावरले नाही तर मात्र मुलींचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, याचा विचार करून पतीच्या दुष्कृत्याबद्दल तक्रार कुठे आणि कशी करायची ? असा गहन प्रश्न मुलींच्या आई समोर उभा राहिला.
मैत्रीत्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप बावस्कर, पोलिस दक्षता समितीच्या सदस्य सुनीता कुठंन यांच्याकडे पीडित मुलीच्या आईने धाव घेतली. मैत्रीत्व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलीसह तिच्या आईला धीर दिला. त्यानंतर वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य केले.
ऑक्टोबर महिन्यातच पुन्हा एका दिवशी बेडरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने आईने विचारले असता नराधम बापाने दरवाजा न उघडता आईला झोपण्यास सांगितले त्यानंतर सकाळच्या सुमारास आईने पीडित मुलीला रात्री काय झाले ? ती का रडत होती ? विचारले प्रश्न असता पीडित मुलीने बापाच्या कृत्याच्या पापाचा पाढाच वाचला होता. त्यानंतरही नराधम बापाने पीडित मुलीसोबतच 8 महिन्याच्या मुलीला दारू पाजणे, पत्नीला बेदम मारहाण असे प्रकार सुरू ठेवले. अखेर आईने शुक्रवारी विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडत असलेल्या प्रसंगाचे कथन केले.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या सविस्तर जबानीवरून पोलिसांनी नराधमाच्या विरोधात शुक्रवारी रात्री भादंवि कलम 376 (अ) (ब) 354 (अ), 323, 504, 506 सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या आरोपीला काही तासांतच बेड्या ठोकल्या. शनिवारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास फौजदार मोहिनी कपिले करत आहेत.
हे ही वाचलं का?