

दुबई : वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान 'सुपर-12' राऊंडमध्येच संपुष्टात आले. ही स्पर्धा सुरू असतानाच जाहीर करण्यात आलेल्या टी-20 क्रमवारीत कोहलीची चौथ्या स्थानावरून आठव्या स्थानी घसरण झाली. तर, सलामी फलंदाज के. एल. राहुल 'टॉप 5' मध्ये पोहोचला आहे.
'सुपर-12' राऊंडमध्ये नामिबियाविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात विराटला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, याच सामन्यात राहुलने शानदार नाबाद अर्धशतकी खेळी करून आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळविले. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या या क्रमवारीत पाकचा कर्णधार बाबर आझम पहिल्या तर इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसर्या स्थानावर आहे. द. आफ्रिकेचा अॅडन मार्कराम तिसर्या स्थानी पोहोचला.
ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच चौथ्या व भारताचा के. एल. राहुल पाचव्या स्थानी आहे. तसेच, पाकचा रिझवान सहाव्या, न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे सातव्या, कोहली आठव्या, जोस बटलर नवव्या तर द. आफ्रिकेचा रॉसी वान डुसेन 10 व्या स्थानी आहे. गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये भारताचा एकही गोलंदाज स्थान मिळवू शकला नाही.