

लंडन, वृत्तसंस्था : सार्या जगात मृत्यूचे तांडव करणारा कोरोनाचा व्हायरस हा चीनचे लष्कर आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोगशाळेच्या संयुक्त प्रकल्पाचाच भाग होता. हा विषाणू लीक झाल्याने जगभर मृत्यूने थैमान घातले होते असे आता समोर आले. यामुळे चीन तेथे घातक जैविक अस्त्र विकसित करत असावा, असा संशय बळावला आहे.
'संडे टाईम्स'ने दिलेल्या वृत्तात हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या वृत्तात म्हटले आहे की, ज्या वेळी कोरानाचा उद्रेक झाला त्याच्या काही काळ आधी चिनी लष्कर आणि वुहानच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसच्या सुधारित विषाणूचा आणखी एका विषाणूशी संयोग करून नवा घातक विषाणू बनवण्याचा प्रयोग करीत होते. हा अत्यंत घातक प्रयोग करतानाचा कोरोनाचा विषाणून लिक झाला आणि प्रयोगशाळेबाहेर गेला. त्याने नंतर सार्या जगाला वेठीला धरले.
शेकडो कागदपत्रे, अनेक गोपनीय अहवाल, अंतर्गत पत्रव्यवहार, संशोधनपर लेख आणि इ मेल यांचा अभ्यास करून हे वृत्त प्रकाशित केल्याचे 'संडे टाईम्स'ने म्हटले आहे. लष्करासोबत प्रयोगशाळेत नेमका कोणता विषाणू तयार केला जात होता हे चीनने जाहीर केले नसले तरी, या सार्या खटाटोपाला चिनी लष्कराचा अर्थपुरवठा असल्याचे समोर आले आहे. यावरून हा जैविक अस्त्र निर्मितीचा भाग असावा असा संशय असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
सार्सच्या विषाणूवर वुहान प्रयोगशाळेत 2003 पासून संशोधन होत होते. त्यासाठी त्यांनी द. चीनमधील गुहांमध्ये असणारी वटवाघळेही आणली होती. 2016 मध्ये संशोधकांना युनान प्रांतात मोजिआंग येथील खाणीत सार्ससारखाच कोरोना विषाणूचा एक प्रकार आढळला होता. त्याचेही चीनने कधी स्पष्टीकरण दिलेले नाही. पण याच विषाणूचा आणखी एका विषाणूसोबत संकर करून नवीनच घातक विषाणू तयार केला जात असावा, असे मानण्यास मोठा वाव आहे.
अमेरिकेची मदत
या स्फोटक तपासात अमेरिकेनेही मदत केली असून संबंधित तपास करणार्यांना अमेरिकी गुप्तचर संस्थांनी गोळा केलेला प्रचंड मोठा डिजिटल डेटा, फोन आणि इंटरनेटची माहिती असा तपशील देण्यात आला होता. नागरी प्रयोगशाळा दाखवून जैविक अस्त्रे विकसित करण्याचा चीनचा प्रयत्न असावा, अशी जगभरातील तज्ज्ञांना खात्री आहे.