

नवी दिल्ली : उपवासाच्या काळात शरीराला योग्य पोषण मिळावे यासाठी अनेक धर्मातील लोक खजुराचे सेवन करीत असतात. खजुराचा वापर मिठाई व अन्य काही गोड पदार्थांमध्येही केला जातो. केवळ स्वादासाठीच नव्हे तर आरोग्यासाठी गुणकारी असल्यानेही खजुर गरजेचे बनते. अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी खजुराचे सेवन गुणकारी आहे, असे तज्ज्ञंनी म्हटले आहे.
एका खजुरात (8 ग्रॅम) 23 कॅलरीज, 0.2 ग्रॅम प्रोटिन, 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 0 ग्रॅम फॅट असते. खजूर हा पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचा चांगला स्रोत आहे. एका खजुरात 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते व त्यामध्ये नैसर्गिक शर्कराही अधिक असते. एका खजुरात केवळ अर्धा ग्रॅम फायबर असते. जसे जसे फळ पिकते तसे शर्करेचे प्रमाण वाढत जाते व फायबरचे प्रमाण कमी होते. खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स 43 ते 55 दरम्यान असू शकतो. खजूर इतके गोड असूनही त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
खजुरात अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यास मदत होते. खजुरातील पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी असते. हृदयाच्या प्रणालीसाठी ते एक गरजेचे इलेक्ट्रोलाईट आहे. रक्तदाब कमी करण्यासाठी पोटॅशियम प्रभावी ठरते. खजुरात सोडियम कमी प्रमाणात असते. खजुरातील मॅग्नेशियम हाडे बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरते.