

पुढारी ऑनलाईन: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने पक्ष सोडणं अत्यंत दुर्दैवी आहे. आता तरी पक्षाने आत्मपरीक्षण करावं, असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आगामी काँग्रेसचा अध्यक्ष हा कळसूत्री बाहुली नसावा. या पदावरील व्यक्ती हा सर्वमान्य असावा, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांवर चव्हाण यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्याचं दु:ख आहे. गेले अनेक वर्ष ते काँग्रेस पक्षासोबत होते. संघटनेत त्यांनी अनेक वर्ष झोकून काम केले आहे. जेव्हा अशा नेत्याला पक्ष सोडून जावं लागतं तेव्हा वाईट वाटतं. कोरोना काळात काँग्रेस अध्यक्षांशी आमची भेट होत नव्हती.
आम्ही सर्वांनी मिळून एक गोपनीय पत्र सोनिया गांधींना लिहिलं. मात्र, दुर्दैवाने हे पत्र माध्यमांमध्ये लिक झाले. भाजप आणि मोदी-शाह यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा अशी मागणी त्या पत्रात आम्ही केली होती. राहुल गांधी हे अध्यक्ष होण्यासाठी तयार असतील तर ठीक अन्यथा निवडणुका घेऊन नवीन अध्यक्षांची नेमणूक करावी असं आम्ही म्हटलं होतं. सतत होणाऱ्या काँग्रेसच्या पराभवाची कारणे काय याचं आत्मचिंतन करण्याची मागणी होती. काँग्रेस पक्षाच्या संविधानात्मक रचनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होणे गरजेचे आहे. ते खूप दिवसांपासून झाले नाही असं चव्हाणांनी म्हटलं.