काँग्रेसचा मोठा आरोप: पराभव दिसू लागल्याने भाजपची टोळधाड, रासने यांनी 500 कोटीचा हिशोब द्यावा

काँग्रेसचा मोठा आरोप: पराभव दिसू लागल्याने भाजपची टोळधाड, रासने यांनी 500 कोटीचा हिशोब द्यावा
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पराभव दिसत आहे. त्यामुळे भाजपने आता पोलिस, ईडी, आयकर विभागाच्या टोळ धाडी सुरू केल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांना प्रचारासाठी तैनात केले आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. महाविकास आघाडीने नागरिकांची कामे करणारा कार्यकर्त्या निवडणुक रिंगणात उतरवल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव अटळ आहे. रासने यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना विकासासाठी आणलेल्या 500 कोटीचा हिशोब द्यावा, अशी मागणी ही लोंढे यांनी केली.

कसबापेठ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. यावेळी आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, मतदार संघाच्या विकासासाठी निवडून देण्याचे आव्हान भाजप उमेदवार रासने करत आहेत. त्यांनी एक प्रकारे आपण अकार्यक्षम आहोत, हे मान्यच केले आहे. तीन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना 28 हजार कोटीचे अंदाजपत्रक सादर केले. यातून 500 कोटीची कामे आपल्या स्वतःच्या मतदार संघासाठी घेतले. मात्र, मतदार संघात कसलाच विकास दिसत नाही. हा निधी नेमका कुठे गेला, याचा हिशोब रासने यांनी पुणेकरांना दिला पाहिजे. मुंबई महापालिकेची चौकशी करणार्‍यांनी पुणे महानगर पालिकेतील पाच वर्षातील कारभाराचाही थर्ड पार्टी, इडी, सीबीआय, आणि आयकर विभागामार्फत तपास करावा, असेही आव्हान लोंढे यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारने कोविडच्या काळातही नागरिकांच्या आरोग्य जपण्यासह राज्याचा विकास केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले आहे. याच विजयाची पुनरावृत्ती कसबापेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत होणार आहे, दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला.

तर मग अंधारात का शपथ घेतली ?

पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवारांशी चर्चा केल्याचा गौस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर बोलताना लोंढे म्हणाले, जर चर्चा झाली होती, तर मग लपत छपत पहाटेच्या अंधारात काय शपथ घेण्यात आली. चर्चा झाली होती तर रात्री एक वाजता राष्ट्रपती राजवट का हटविण्यात आली.

आता डंके की चोट वाले कुठे गेले ?

महाविकास आघाडी सरकारने आपल्या काळात एस.टी. कर्मचार्‍यांना वेतनवाढ दिली. त्यांचा वेळचेवेळ पगार दिला. आता मात्र, कर्मचार्‍यांच्या पगार थकविण्यात आला आहे. त्यावेळी आंदोलन करणारे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि डंके की चोट म्हणत छाती बडवणारे आता कुठे गेले ? आता त्यांना विलीनिकरण आठवत नाही का ? असे सवालही लोंढे यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच श्रेय लाटण्यासाठीच पडळकर, खोत यांनी एमपीएससी परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उडी घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे बोलणे करून देण्याचे नाटक केले, मात्र प्रश्न सुटलेला नाही, असेही लोंढे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news