पुणे : बिनधास्त तक्रार करा दोन तासात अ‍ॅक्शन; नागरिकांना ताटकळत ठेवणार्‍या ठाणेदारांवर आयुक्तांची नजर

पुणे : बिनधास्त तक्रार करा दोन तासात अ‍ॅक्शन; नागरिकांना ताटकळत ठेवणार्‍या ठाणेदारांवर आयुक्तांची नजर
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे : अहो, आमचे साहेब जरा बाहेर गेले आहेत ! एक तासांनी परत येता का ? साहेबांनी सांगितले आहे मला विचारूनच तक्रार घ्यायची, ठाणे अंमलदार जरा दुसर्‍या कामात आहेत.. अहो ती आमची हद्द नाही..असं करा तुम्ही तेथील चौकीत जाऊन तक्रार द्या…म्हणजे झालं.. महिला अधिकारी आले की तुमची तक्रार लगेच घेण्यास सांगतो, मात्र थोडा वेळ थांबा !

तुम्ही पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यास अशी उत्तरे ऐकली असतील. एवढेच नाही तर तक्रारदारांना तासन् – तास ताटकळत ठेवल्याचे देखील ऐकले असेल, किंवा अनुभवले सुद्धा असेल. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली असून, दोन तासात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे अधिकारी या सूचनांचे पालन करणार नाहीत, तक्रारीची दखल घेण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त, अपर पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त अशा अतिवरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक पार पडली. त्यावेळी आयुक्तांनी पोलिस ठाणे स्तरावरील कामकाजाचा आढावा घेतला. पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारींची दखल घेण्यास टाळाटाळ करून वेळकाढूपणा केला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोन तासात तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. याबाबतचा लेखी आदेश सुद्धा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगितले.

पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी लोकाभिमुख पोलिसिंग राबविणार असल्याची ग्वाही पुणेकरांना दिली होती. त्यानुसार त्यांनी आता आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होऊन, त्यांना समाधान वाटले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीची तक्रार आपल्या संदर्भात नसेल तर त्यांना तसे मार्गदर्शन करून सांगितले पाहिजे. महिला व लहान मुलांच्या संदर्भातील प्रत्येक तक्रारींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. एखादी तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा नागरिक पोलिस चौकीत जातात, तेव्हा त्यांना या चौकीतून-त्या चौकीत फिरवले जाते. पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागतात. प्रश्नांचा भडीमार तक्रारदारावरच केला जातो. असे चित्र शहरातील अनेकदा दिसून येते.

न्यायालयावरील ताण होईल कमी
दोन तासात तक्रारीची दखल घेतली गेल्यास अप्रत्यक्षरित्या न्यायालयात दाखल होणार्‍या तक्रारी कमी होण्यास मदत होईल. खासगी तक्रारी न्यायालयात दाखल झाल्यानंतर बर्‍याच प्रकरणात पोलिस ठाण्याच्या प्रभारींना न्यायालयाच्या रोषाला समोरे जावे लागते. तक्रारींची योग्य दखल घेतली गेल्यास बर्‍याच प्रकरणात प्राथमिक स्तरावरच न्याय मिळाण्यास मदत होईल.

हे गरजेचेच
सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना तेथे कशाप्रकारची वागणूक मिळाली? त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत ? तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांची वागणूक कशी होती ? याची माहिती ठेवण्यासाठी सेवा प्रणाली सुरू करण्यात आली. पोलिस ठाणे स्तरावर त्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे जर पोलिस ठाणेस्तरापासून वरिष्ठ अधिकार्‍यांजवळ तक्रारदारांचे समाधान झाले नाही, किंवा त्यांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली गेली नाही शेवटी त्यांना आयुक्तांकडे दाद मागता येत होती. मात्र सध्या सेवा प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला जात नसल्याचे दिसून येते.

तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना ताटकळत थाबविले जात असल्याचे समोर आल्यानंतर, हा प्रकार आम्ही गांभीर्याने घेतला असून, दोन तासात तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. जे अधिकारी तक्रारींबाबत टाळाटाळ करून दिरंगाई करतील त्यांची गंभीर दखल घेतली जाईल.

                                                                                  – रितेश कुमार
                                                                           पोलिस आयुक्त, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news