

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : जेजुरी नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे नियमबाह्य काम पाहणार्या व मनमानी करत नागरिकांना वेठीस धरणार्या बाळासाहेब बगाडे या अधिकार्याची जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या विभागाचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्याकडे बगाडेंबाबत अभिप्रायासह सविस्तर अहवाल मागविला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, जेजुरी नगरपालिकेत बगाडे हे नोडल अधिकारी निमशासकीय व कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. ते मनमानी करून आरोग्य विभागातील कर्मचारी व नागरिकांना नाहक त्रास देत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या जिल्हा प्रभारी अलका शिंदे, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, साधना दिडभाई, माजी नगरसेवक रमेश बयास, शिवसेनेचे सोहम स्वामी, मनसेचे उमेश जगताप, राष्ट्रवादीचे एन. डी. जगताप, उद्योजक प्रशांत लाखे, मनीष निकुडे, संभाजी बि—गेडचे संदीप जगताप आदी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
संबंधित बातम्या :
काय आहेत तक्रारी ?
नोडल अधिकारी बाळासाहेब बगाडे हे स्वच्छता व आरोग्य विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार कोणत्या तरतुदींच्या आधारे व कोणाच्या मान्यतेने दिला, याची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी. आरोग्य व स्वच्छतेच्या समस्या घेऊन येणार्या नागरिकांची ते अडवणूक करतात. ठेका पद्धतीने काम करणार्या कर्मचार्यांचे वेतन जाणीवपूर्वक अडवून त्यांना वेठीस धरतात. महिला बचत गटांच्या कर्जवाटपात अनियमितता आहे, अशा तक्रारी निवेदनात केल्या आहेत.
तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई
या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी 22 नोव्हेंबरला जेजुरीचे मुख्याधिकारी व आरोग्य, स्वच्छता विभागाचे क श्रेणी अभियंता यांच्याकडे स्वयंस्पष्ट खुलासा व अहवाल मागविला आहे. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास मुख्याधिकारी व आरोग्य-स्वच्छता अभियंता यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.