

मुंबई : जन्मतः कानाने ऐकू येत नाही म्हणून बोलताही येत नाही, अशा पाच वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांसाठी 'कॉकलियर इम्प्लांट' हे विशिष्ट प्रकारचे श्रवणयंत्र वरदान ठरले आहे. मूकबधिर बालकांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या कानात हे श्रवणयंत्र बसविल्यावर साधारण सहा महिने ते वर्षभरातच शेकडो मुले सहजरीत्या ऐकू आणि बोलू लागली आहेत. त्यांच्या जीवनात हा चमत्कार घडविण्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने केलेली आर्थिक मदत फारच मोलाची ठरली आहे.
'कॉकलियर इम्प्लांट' शस्त्रक्रियेसाठी सुमारे 750 मूकबधिर बालकांना तब्बल 15 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
जन्मतः मूकबधिर असलेल्या पाच वर्षांच्या आतील बालकांवर कर्ण शस्त्रक्रिया करून त्यांच्या कानातील आतील भागात 'कॉकलियर इम्प्लांट' हे श्रवणयंत्र बसविले जाते. या यंत्राचा अर्धा भाग कानाच्या अगदी आत तर अर्धा थोडा भाग कानाबाहेर असतो. दोन्ही भाग मॅग्नेटिक कॉईलने एकमेकांना चिकटतात. यंत्रात केसासारखे बारीक 24 इलेक्ट्रोडस् असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आवाज मुलांना ऐकायला येतात. आवाजाच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचून बोलण्याची प्रक्रिया सुरू होते. शस्त्रक्रियेनंतर सहा महिने ते एक वर्षात मुले बोलायला लागतात, अशी माहिती 'कॉकलियर इम्प्लांट' शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉ. सुधीर कदम यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.
शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर बालकांना बोलण्याचा सराव होण्यासाठी दोन वर्षे 'स्पीच थेरपी ' दिली जाते. त्यानंतर ही मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे स्पष्ट ऐकू आणि बोलू लागतात. त्यांना शिक्षणासाठी मूकबधिर शाळेत पाठविण्याची गरज राहात नसल्याचे त्यांनी सांगितले.
या शस्त्रक्रियेसाठी एकूण 7 लाखांचा खर्च येतो. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत श्रवणयंत्र बसविण्यासाठी 5 लाख 20 हजारांचे अनुदान मिळते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत सुमारे 750 बालकांच्या कानात ही श्रवणयंत्रे बसविण्यात आले. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मिरज, लातूरसह 20 ठिकाणी ही शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.
आमचा मुलगा सर्वेश दीड वर्षांचा होता. जन्मापासूनच त्याला काहीही ऐकू येत नव्हते. 'कॉकलियर इम्प्लांट' शस्त्रक्रिया झाल्यावर वर्षभरातच तो बोलू लागला. त्याला सामान्य मुलांच्या शाळेत घातले. आता तो तिसरीत शिकत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीमुळे मुलगा बोलू लागला, अशी भावना जयसिंगपूर येथील परशुराम लंगारे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सुमारे तीन हजार मूकबधिर बालकांवर 'कॉकलियर इम्प्लांट' शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यक्रम राबवून दरवर्षी 150 कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा डॉ. सुधीर कदम यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान या राज्यांमध्ये शस्त्रक्रियेसाठी निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.