राष्ट्रीय स्तरावरील साखर पुरस्कारात महाराष्ट्राचा डंका, 21 पैकी 10 पारितोषिक पटकावित देशात प्रथम क्रमांक

राष्ट्रीय स्तरावरील साखर पुरस्कारात महाराष्ट्राचा डंका, 21 पैकी 10 पारितोषिक पटकावित देशात प्रथम क्रमांक
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत साखर उद्योगात उल्लेखीनय कामगिरी करणार्‍या साखर कारखान्यांना दिले जाणारे आर्थिक वर्ष 2021-22 मधील पुरस्कार घोषित झाले आहेत. त्यामध्ये एकूण 21 पैकी 10 पारितोषिक पटकावित आणि प्रथम क्रमांक मिळवित देशभर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचाच डंका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यांसाठीचे अत्यंत मानाचे असलेले वसंतदादा पाटील पारितोषिक कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. (जि.कोल्हापूर) यांना मिळाले आहे. दुसर्‍या क्रमांकावरील उत्तर प्रदेश व तामिळनाडूला प्रत्येकी तीन पारितोषिके प्राप्त झाली आहेत. गुजरात व हरियाणा यांनी प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली आहेत. तर मध्य प्रदेशाला एक मिळाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज पारितोषिक विजेत्या कारखान्यांनी नांवे जाहीर केली. त्यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

देशातील सर्व 267 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात येते. त्या आधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वाधिक निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणार्‍या देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन केले जाते. त्याआधारे दिल्लीस्थित केंद्रीय मुख्य साखर संचालक यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीद्वारे वर्ष 2021-22 साठीची एकूण 21 पारितोषिके निश्चित करण्यात आली आहेत. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यंदाच्या वर्षाच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातील 65 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्रातील 27, गुजरात 9, तामिळनाडू 9, पंजाब 6, हरियाणा 5, उत्तर प्रदेश 5, कर्नाटक 3 आणि मध्य प्रदेश 1 यांचा समावेश आहे. पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतार्‍यामध्ये किमान सरासरी 10 टक्के असणार्‍या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यातील साखर कारखान्यांचा सहभाग होता तर उर्वरित सरासरी 10 टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा असणार्‍या राज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूतील साखर कारखान्यांचा समावेश होता. तसेच एका कारखान्याला एक पारितोषिक असे धोरण ठरविण्यात आले. या धोरणामुळे सर्व कारखान्यांच्या कामगिरीला न्याय मिळतो.

गुणवत्ता पारितोषिके नवी दिल्ली येथे होणार्‍या एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय अन्न मंत्री पियुष गोयल तसेच साखर उद्योगाशी संबधित महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांतील मंत्री व संबधित वरिष्ठ अधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

राष्ट्रीय पारितोषिक तपशील:

सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना: श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल ,जिल्हा कोल्हापूर.

उत्कृष्ट ऊस उत्पादकता : उच्च उतारा विभाग:
प्रथम पारितोषिक – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि.पुणे (महाराष्ट्र)
द्वितीय पारितोषिक – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृतनगर (महाराष्ट्र).

उर्वरित विभाग: प्रथम पारितोषिक – : नवलसिंग सहकारी साखर कारखाना मर्यादित, नवल नगर, बुर्‍हाणपूर (मध्य प्रदेश). द्वितीय पारितोषिक कल्लाकुरीची को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.काचीरायापालयम, तामिळनाडू.

तांत्रिक कार्यक्षमता : उच्च उतारा विभाग:

प्रथम पारितोषिक – श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि.सोलापूर (महाराष्ट्र)
द्वितीय पारितोषिक – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर ,पुणे (महाराष्ट्र).

उर्वरित विभाग : प्रथम पारितोषिक – दि कर्नाल को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.कर्नाल (हरियाणा) द्वितीय पारितोषिक – दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. साथिऑन ,अजमगड (उत्तर प्रदेश).

उत्कृष्ट वित्तीय व्यस्थापन- उच्च उतारा विभाग :

प्रथम पारितोषिक – श्री नर्मदा खांड उदयग,सहकारी मंडली लि.(गुजरात)
द्वितीय पारितोषिक – श्री खेडूत सहकारी खांड उदयग मंडली लि.बार्डोली (गुजरात).

उर्वरित विभाग – प्रथम पारितोषिक – चेंगलारायन को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.तामिळनाडू, द्वितीय पारितोषिक – दि किसान सहकारी चिनी मिल्स लि.स्नेह रोड,नजीबाबाद (उत्तर प्रदेश).

विक्रमी ऊस गाळप- उच्च उतारा विभाग: विठ्ठलराव शिंदे स.सा.का. पिंपळनेर, माढा, सोलापूर (महाराष्ट्र), उर्वरित विभाग: शाहाबाद को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.कुरुक्षेत्र (हरियाणा).

विक्रमी साखर उतारा- उच्च उतारा विभाग: डॉ पतंगराव कदम सोनहिरा स.सा.का. लि.सांगली (महाराष्ट्र), उर्वरित विभाग- दि किसान सहकारी चिनी मिल्स लि.गजरौला (उत्तर प्रदेश).

विक्रमी साखर निर्यात- प्रथम पारितोषिक : श्री दत्त शेतकरी स.सा.का.लि.शिरोळ, कोल्हापूर (महाराष्ट्र), द्वितीय पारितोषिक : सह्याद्री स.सा.का लि.सातारा (महाराष्ट्र).

अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना: उच्च उतारा विभाग – क्रांतिअग्रणी डॉ जी..डी .बापू लाड स.सा.का.लि.सांगली (महाराष्ट्र), उर्वरित विभाग -डी. एस. सुब्रमणिया सीवा को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.(तामिळनाडू).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news