

रोम : उत्तर इटलीच्या वेनेटोमध्ये वसलले व्हेनिस शहर जगभरात 'कालव्यांचे शहर' म्हणून प्रसिद्ध आहे. 118 छोट्या बेटांनी मिळून बनलेल्या या शहरात 150 कालवे आणि 400 पेक्षाही अधिक छोटे-मोठे पूल आहेत. आता जागतिक तापमानवाढीचा या सुंदर शहरालाही फटका बसला आहे. या शहरातील कालवे कोरडे पडले असून शहराचे हे थक्क करणारे द़ृश्य जगाला आता पाहायला मिळत आहे.
या कालव्यांच्या शहराचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून दरवर्षी सुमारे 2 कोटी पर्यटक येत असतात; मात्र गेल्या पंधरा दिवसांच्या काळात हे शहर कोरडे पडले आहे. शहरातील कालव्यांमधील पाणी आटले असून तिथे केवळ तळाशी असलेला चिखलच पाहायला मिळत आहे. या कालव्यांमधून थाटात फिरणार्या 'गोंडोला' नावाच्या नौका चिखलात अडकल्या आहेत किंवा भिंतीला लटकत आहेत.
1602 मध्ये व्हेनिस शहर वसवले गेले होते. या ठिकाणी पो आणि पियावे नावाच्या दोन नद्या वाहतात. समुद्राजवळ असलेल्या आणि भूभागात अडकलेल्या उथळ पाण्याच्या जागी हे शहर आहे. इटलीतील सर्वात लांब नदी असलेल्या 'पो'चे पाणी आता 61 टक्के कमी झालेले आहे. नदीतील पाणी आटल्याने तसेच पाऊस न झाल्याने कालव्यांमध्येही पाणी नाही. गेल्या वर्षीही संपूर्ण युरोपमध्ये तापमानाने कहर केला होता व अनेक ठिकाणी दुष्काळही पडला होता. 2022 चा दुष्काळ हा इटलीच्या 70 वर्षांच्या इतिहासातील सर्वात भयानक दुष्काळ ठरला. आता यावर्षीही स्थिती बिघडू शकते, असे म्हटले जात आहे. यावर्षी आल्प्सच्या पर्वतराजीत हिवाळ्यातील हिमवृष्टीही कमी झाली आहे.