

बीजिंग, वृत्तसंस्था : चीनचे परराष्ट्रमंत्री किन गेंग 25 जूनपासून राजकीय पटलावरून गायब आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांना पदावरून हटवल्याचे सांगण्यात येते. गेंग यांचे एका प्रसिद्ध चिनी टीव्ही अँकरसोबतचे प्रेम प्रकरण चव्हाट्यावर आल्याने त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचे पाश्चात्त्य माध्यमांतून सांगितले जात आहे.
गेंग यांनी 25 जून रोजी श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून आजअखेर ते सार्वजनिक व्यासपीठावर दिसले नाहीत. गेंग हे आजारी आहेत, असे चिनी माध्यमांतून सांगितले जात आहे. पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे मात्र वेगळीच कथा सांगत आहेत.
टीव्ही अँकर फू झियाओटियन हिच्यासोबत गेंग यांच्या प्रकरणामुळे कम्युनिस्ट पक्षाची बदनामी होत असल्याने त्यांना पदावरून हटविल्याचे वृत्त या माध्यमांतून जगभर पसरले आहे. किन गेंग यांनी डिसेंबर 2022 मध्ये पदभार स्वीकारला होता. पुढे मार्च 2013 पासून फू प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. गेंग यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याआधीचे (गेंग यांच्या) परराष्ट्रमंत्री वांग यी हेच आता परराष्ट्रमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.