Children’s Health : बाळाच्या अंगावर पुरळ उठल्यास…

Children’s Health : बाळाच्या अंगावर पुरळ उठल्यास…
Published on
Updated on

Children's Health : लहान मुलांची त्वचा थोडी वेगळी असते. बाळाप्रमाणेच कोमल आणि निरागस असते. पहिल्या वर्षी बाळाच्या त्वचेची पूर्ण वाढ झालेली नसते. हवामानात होणारे बदल, आईच्या दुधात होणारे बदल, वरून खायला घातलेले पदार्थ (गायीचे दूध, पावडरचे दूध किंवा 6 महिन्यांनंतरचा आहार), अंगाला लावलेले प्रॉडक्ट, दागिने व कपडे या सर्व गोष्टींचा बाळाच्या त्वचेवर परिणाम होत असतो.

आपल्या नवीन मातांचा आहार खूप बदलला आहे. पाश्चिमात्य आहारावर थोड्या प्रमाणात गेला आहे आणि त्यामुळे नवीन बाळांना थोडे वेस्टर्न प्रॉब्लेम्स जास्त येऊ लागले आहेत. विशेषतः अ‍ॅलर्जीचे प्रकार आता खूप जास्त प्रमाणात दिसतात.

आणखी एक गोष्ट आया विचारतात ती म्हणजे आमच्या बाळाचा रंग बदलला! बाळ जन्मतःच गोरे असते. कारण, तेव्हा रंग बनवणार्‍या पेशी पूर्ण काम करत नसतात. 3 महिन्यांनंतर या पेशी काम करू लागतात आणि बाळाचा मूळ रंग येतो. कृपया बाळ गोरे होण्यासाठी त्याला कुठलेही फेअरनेस क्रीम लावू नका.

1) बाळांना होणारे 60 टक्के त्वचारोग खूप काळजी करण्यासारखे नसतात. त्यात घामोळे, डास किवा किडे चावून येणारे फोड यांचा समावेश होतो. आईच्या दुधातून येणार्‍या हॉर्मोन्समुळे अगदी तान्ह्या मुलांनासुद्धा मुरुम येतात.

2) 20-30 टक्के रॅशेस अशा असतात ज्यांच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उदाहरणार्थ, डायपर रॅश. लघवी व संडासच्या जागी लाल चुटुक पुरळ आले आणि ते चिघळल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांना भेटा. अ‍ॅटॉपिक डर्मिटायटिस ही एक प्रकारची अ‍ॅलर्जी आहे.

3) 10 टक्के पुरळ असे असतात की, त्यावेळी त्वरित डॉक्टरला गाठलेच पाहिजे. उदाहरणार्थ, पुरळाबरोबरीने ताप येणे, पाणी भरलेले फोड येणे.

Children's Health : काय करावे?

1) उन्हाळ्यात बाळाला दिवसाआड अंघोळ घालावी किंवा रोज अंग पुसून घ्यावे. बाळाच्या साबणाचा फेस करून अंघोळ घालावी. अंघोळीनंतर लगेच दोन-तीन मिनिटांनी मॉइश्चरायझर लावावे. पेराबेन नसलेले मॉइश्चरायझर निवडावे.

2) अंघोळीआधी बाळाला खोबरेल तेलाने मसाज करावा. 100 टक्के एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑईल सर्वात उत्तम. मसाज किवा मालिश खूप जोरात हात-पाय न ओढता करावे. मी आयांना सांगते की, शक्यतो तुम्ही स्वतःच मसाज करत जा. यामुळे आई आणि बाळाची जवळीकही वाढते.

3) बाळाला डायपर वापरत असल्यास दिवसातून 1-2 तास तरी डायपर काढून मोकळे ठेवावे. डायपर लावण्याआधी पुरळ होऊ नये म्हणून खास क्रीम्स येतात ती लावावीत. ती जागा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

4) उन्हाळ्यात 3 महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांना पोटावर ठेवावे. सारखं गुंडाळून ठेवू नये. यामुळे घामोळ्या कमी होतात.

Children's Health : काय करू नये? :

1) डाळीचे अथवा कोणतेही पीठ बाळाला लावू नये.

2) पहिल्यांदा अन्न देताना एक एक पदार्थाने सुरुवात करावी. जसे एका आठवड्यात एकच भाजी किंवा फळ. यामुळे बाळाला कशाची अ‍ॅलर्जी आहे का, हे ओळखता येते. खाण्यातून होणार्‍या अ‍ॅलर्जीचे प्रमाण पूर्वीच्या मनाने खूपच वाढले आहे.
आपल्याकडे बाळाला चाटण, गुुटी द्यायची पद्धत आहे; पण शक्यतो एक एक पदार्थच द्यावा. अंडी, दाणे, नटस्, नॉनव्हेज किंवा फॉर्म्युला फूड हे अ‍ॅलर्जीला कारणीभूत काही पदार्थ आहेत.

3) ज्या बाळाला अ‍ॅलर्जी आहे किंवा त्वचा कोरडी आहे त्या बाळाला कुठल्याही प्रकारचे दागिने घालू नयेत. कारण, दागिने ओले राहतात. त्यावर जंतू जमतात आणि बाळाला इन्फेक्शन किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते.

4) बाळाच्या डोळ्यांत शक्यतो काजळ घालू नका. एक तर आपण पुन्हा पुन्हा त्या डबीत बोट घालतो आणि ते बाळाच्या डोळ्यात घालतो. हे स्वच्छतेच्या द़ृष्टीने योग्य नाही.

5) एकच डायपर खूप वेळ ठेवूनका. दर 4-6 तासांनी ते बदला.

6) लोकरीचे कपडे घालू नका. आपल्याकडे बाळ आणि लोकर हे एकत्रच जातात. खरे तर आपल्या हवामानाला लोकरीचे कपडे योग्य नाहीत. लोकर टोचते, त्यात स्टॅटिक होते. धूळ बसते आणि आजकाल लोकर सिंथेटिकही असते.

7) एक वर्षापेक्षा मोठ्या बाळाला अ‍ॅलर्जीचा त्रास असेल, तर त्यांना सिंथेटिक कपडे घालू नका.

8) घरातील व्यक्तींना काही त्वचारोग झाला असेल, जसे की नायटा, फंगल इन्फेक्शन असेल, तर उपचार करून घ्या.

डॉ. मुक्ता तुळपुळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news