

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : त्यांनी मुंबईवर दरोडा घातला. 25 वर्षे महापालिका लुटून स्वतःची घरे भरली. कोव्हिडकाळात प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम केले. म्हणूनच त्यांची चौकशी सुरू झाली. हा भ्रष्टाचार आम्ही खणून काढू. दोषींना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. मात्र, त्यांनी ठाकरे यांचा थेट नामोल्लेख केला नाही.
पुढील वर्षी होणार्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरही आमचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आनंदाश्रमात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत हे भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्तार करण्यात कसलीही अडचण नाही. सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी खूप चांगले काम केले आहे. बहुमत असलेले सरकार कोसळण्याचे स्वप्न पाहणार्यांना स्वप्नातच राहू द्या, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करीत असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.
राज्यात आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठणारे आता घाबरून मुंबई महापालिकेवर मोर्चा काढत आहेत. हा प्रकार म्हणजे दरोडा घालायचा आणि चोरी झाल्याची ओरड करायची, असा आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी कोव्हिड काळात रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे पाप कुणी केले, हे चौकशीतून लवकरच समोर येईल, असा दावाही केला.
सरकारची वर्षपूर्ती ही खर्या अर्थाने फलदायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा आणि 50 आमदारांच्या धाडसामागे उभे राहून सरकार स्थापण्यात पुढाकार घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले
ते म्हणाले, वर्षभरात सर्व घटकातील लोकांच्या भल्यासाठी सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. एकही निर्णय व्यक्तिगत स्वार्थापोटी घेतलेले नाही. महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकांवर आणण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेवरील 1 जुलैच्या मोर्चावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, कोव्हिड काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा उच्च्चांक झाला. अनावश्यक खर्च टाळून रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला असता तर साडेतीन हजार कोटी वाचले असते आणि खड्ड्यांमुळे लोकांचे बळीही गेले नसते. हा सर्व भ्रष्टाचार बाहेर पडणार असल्याने दरोडा घालणारी शिवसेना आता चोरी झाल्याची ओरड करण्यासाठी मोर्चा काढत आहे.
अजित पवार 'क्लीन बोल्ड' विसरणार नाहीत
सरकारच्या वर्षपूर्तीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ते मनातून बोलत नसावेत. बोलावे लागते म्हणून ते बोलतात. शरद पवार यांनी फडणवीस यांना नव्हे तर आपल्या पुतण्याला क्लीन बोल्ड केले आहे. हे अजित पवार विसरणार नाहीत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.