

आळंदी, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील मोगल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आल्याचे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सांगितले. राज्यात शिवरायांच्या नावाने सुरक्षा कॉरिडॉर उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त झालेल्या आळंदी गीताभक्ती महोत्सवात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पीठाधीश शंकराचार्य महाराज, गोविंददेव गिरीजी महाराज, उत्तर प्रदेश जलसंपदामंत्री स्वतंत्र देवसिंग, रामदेव बाबा, आदेशानंद महाराज, राजेंद्रदास महाराज, काडसिद्धेश्वर महाराज कणेरी मठ, शांतीब—ह्म मारुतीबाबा कुर्हेकर, चिदानंद सरस्वती महाराज, बाळकृष्ण महाराज, साध्वी भगवतीदेवी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, रमेशभाई ओझा, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, आमदार उमा कापरे, अजय भुतडा, राजा लुईस आदी उपस्थित होते. भक्ती आणि शक्तीचा संगम महाराष्ट्रात झाला म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे
राजे श्रीसमर्थ रामदास घडवू शकले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभे केले. औरंगजेबाला याच महाराष्ट्रात तडफडत मरण्याची वेळ शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आली, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
जिजाऊच शिवरायांचे मार्गदर्शक : पवार
दरम्यान, आमच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये माँसाहेब जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक समर्थ रामदास स्वामी हेच असल्याचे म्हटले होते. त्याला पवार यांनी प्रतिउत्तर दिले.