छत्रपती शिवाजी महाराज : नौदलाचे महत्त्व जाणणारे राजे 

छत्रपती शिवाजी महाराज : नौदलाचे महत्त्व जाणणारे राजे 
Published on
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुसज्ज अशा नौदलाची (आरमार) केलेली उभारणी हे त्यांचे फार मोठे कार्य आहे. सिद्दी, ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी त्यांनी योग्य ठिकाणी सागरी किल्ले उभारले. छोट्या-मोठ्या नौका, जहाजांची बांधणी केली. तो काळ असा होता की, शिवाजी महाराजांच्या प्रबळ नौदलाचा ताफा समोरून जात असताना पोर्तुगीजांच्या नौदलाने कोणतीही हालचाल केली नाही. ब्रिटिशांनी तर कान्होजी आंग्रे यांच्याकडे समुद्रातून मालाची ने-आण करण्यासाठी अखेरपर्यंत कर भरला.

छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेताच विजापूरच्या आदिलशाहीशी आणि मुघलांशी त्यांनी दिलेल्या लढ्याची आठवण होते. किंबहुना छत्रपतींच्या त्याच संघर्षाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. छत्रपती शिवरायांनी आणखी अनेक अवघड गोष्टी साध्य करून दाखविल्या. शिवरायांनी उभारलेले आधुनिक नौदल (आरमार) आणि जहाज बांधणी उद्योगाचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन ही त्यापैकीच एक गोष्ट होय. गुजरातमधील लोथल येथे प्राचीन बंदर आणि जहाज बांधणीची जी जागा आढळून आली आहे, ती इसवी सनाच्या एक हजार वर्षे मागे घेऊन जाते. जहाज बांधणीच्या कलेत भारतीय लोक प्राचीन काळापासून निपुण आणि अग्रेसर होते, हे यावरून लक्षात येते. भरुच, कल्याण, चौल आणि सोपोर येथील बंदरे संपूर्ण मध्यपूर्व आशियात त्याकाळी प्रसिद्ध होती; परंतु समुद्रमार्गे होणार्‍या व्यापारातील भारतीयांचे प्रमाण आणि जहाजांची संख्याही चौदाव्या शतकानंतर कमी होत गेली. उत्तरेकडून भारतावर मुस्लिम सुलतानांनी केलेल्या स्वार्‍या हे त्याचे प्रमुख कारण होते.

भारतीयांनी भूमी गमावल्यानंतर सागरी व्यापार आणि जहाजांची संख्या कमी झाली आणि ही पोकळी नंतर अरबांनी भरून काढली. अरबस्तानातून येणार्‍या व्यापार्‍यांच्या वसाहती लवकरच भारताच्या पश्चिम तटावरील बहुतांश महत्त्वाच्या बंदरांजवळ उभ्या राहू लागल्या. अशा काळात सागरी शक्तीची जाणीव असलेले जे मोजके राज्यकर्ते त्याकाळी झाले, त्यापैकी शिवाजी महाराज हे एक होत. त्यांनी दौलतखान आणि मयंक भंडारी यांची नौदलाचे संयुक्त प्रमुख म्हणून नियुक्ती केली. लढाऊ नाविक दलाला पाठबळ देण्यासाठी अनेक सागरी किल्ले बांधले. मुंबईपासून 150 किलोमीटर दक्षिणेला महाराजांनी मुख्य नाविक तळ उभारला. ही जागा पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्दीच्या नौदल तळांपासून सुरक्षित अंतरावर होती.

मालवणपासून दोन किलोमीटर पाण्यात असलेल्या खडकावर उभारलेला हाच तो सिंधुदुर्ग किल्ला होय. 10 नोव्हेंबर 1664 रोजी या किल्ल्याच्या कामाला सुरुवात झाली आणि 1667 मध्ये किल्ला बांधून तयार झाला. स्थानिक मच्छिमारांना शिवाजी महाराजांनी नौदलात भरती करून घेतले. त्यांना सढळहस्ते निधी दिला. त्यानंतरच्या काही वर्षांत एकंदर 58 किल्ले शिवरायांनी वापरात आणले. विजयदुर्ग आणि अलिबागजवळील कुलाबा हे त्यातील महत्त्वाचे किल्ले होत.

फेब—ुवारी 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नाविक दलाच्या ताकदीची चाचणी घेण्याचे ठरविले. दोन मोठ्या जहाजांसह 88 नौकांच्या ताफ्यासह चार हजारांचे सैन्य घेऊन मराठ्यांच्या नौदलाने बसरूर या बंदरावर हल्ला चढविला. हा ताफा बसरूरकडे निघाला असताना गोव्याजवळ पोर्तुगीजांच्या नौदलातील सैनिकांनी पाहिला; परंतु प्रबळ असे मराठा नौदल पाहून पोर्तुगीजांनी शहाणपणाने या ताफ्यापासून दूरच राहणे पसंत केले. 1680 पर्यंत मराठा नौदल खूपच शक्तिशाली बनले होते. मराठा नौदलाकडे त्याकाळी 300 टन वहन क्षमता असलेली 45 मोठी जहाजे होती, तर 150 छोट्या नौका आणि सुमारे 1100 गलबते या ताफ्यात होती. ब्रिटिश व्यापार्‍यांचा भारतातील कावा ओळखणार्‍या मोजक्या भारतीय राजांपैकी छत्रपती शिवाजी महाराज हे एक होत.

मुंबईजवळ जंजिरा येथे ब्रिटिशांनी सिद्दीला दिलेला आश्रय हे ब्रिटिश आणि मराठे यांच्यातील पहिल्या संघर्षाचे कारण ठरले. सिद्दी हा नावालाच विजापूरच्या सुलतानाचा मांडलिक होता; परंतु जेव्हा त्याला मराठ्यांकडून धोका जाणवला, तेव्हा त्याने सुरतच्या मुघल शासकाची मदत मागितली. सुरतमध्ये ब्रिटिशांचे व्यापारी हितसंबंध असल्यामुळे ते मुघलांशी चांगले संबंध ठेवू इच्छित होते. या परिस्थितीचा सिद्दीने पुरेपूर फायदा घेतला आणि सागरी ताकदीचा आधार घेऊन मराठ्यांच्या ताब्यातील अनेक इलाख्यांवर हल्ले केले. मराठ्यांच्या नौदलाशी सिद्दीची गाठ पडली, तेव्हा तो पुरता घाबरला आणि मुंबई बंदराजवळ त्याने आश्रय घेतला.

हे ठिकाण तोपर्यंत ब्रिटिशांचे पश्चिम किनारपट्टीवरील मुख्य व्यापारी केंद्र बनले होते. परदेशी ताकदीला आणि सिद्दीला शह द्यायचा असेल, तर मुंबईकडे येणारा त्यांचा मार्ग बंद करायला हवा आणि त्यासाठी तसा एक किल्ला बांधायला हवा, हे शिवरायांनी ओळखले. 1672 मध्ये शिवरायांनी मुंबईच्या दक्षिणेला असलेले खांडेरी हे छोटे बेट ताब्यात घेतले. हे बंदर मुंबईकडे सागरी मार्गाने येणार्‍या शत्रूला थोपविण्यास योग्य होते आणि त्याच्या साह्याने ब्रिटिशांना शह देता येईल, हे शिवाजी महाराजांनी ओळखले. काळजीपूर्वक सर्व जुळवाजुळव करून त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये शिवरायांनी या बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. दक्षिणेच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी पश्चिमेकडील बहुतांश समुद्रकिनार्‍यांवर हुकूमत प्रस्थापित केली होती. शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय योग्य असून, मराठा नौदलाचे स्मरण त्यानिमित्ताने होईल आणि आपल्या नौदल परंपरेलाही उजाळा मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news