

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बहुउद्देशीय सभागृह, रमणमळा येथे होत असून दुपारी चार वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. सर्वात प्रथम संस्था प्रतिनिधी गटाचा निकाल जाहीर होईल. दरम्यान, पोलिस प्रशासनाने दोन्ही आघाड्यांच्या समर्थकांना निकाल ऐकण्यास उभारण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे निश्चित केली आहेत.
मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. 29 टेबलवर दोन फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिली फेरी सकाळी आठ ते दुपारी एक, तर दुसरी फेरी दुपारी दोन ते सायंकाळी सहा या दरम्यान होणार आहे. पहिल्या फेरीत 1 ते 29 मतदान केंद्रातील तर दुसर्या फेरीत 30 ते 58 मतदान केंद्रातील मतमोजणी होईल.
दरम्यान, मतपेट्या नोंद घेऊन स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी जाळी बांधून 29 टेबलचा परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. उमेदवार आणि प्रतिनिधी यांना जाळीच्या बाहेर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी चार कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चोख पोलिस बंदोबस्त
मतदानापूर्वी झालेले टोकाचे आरोप-प्रत्यारोप आणि अटीतटीने झालेले मतदान यामुळे मतमोजणी वेळी खबरदारीचा उपाय म्हणून सत्तारूढ आघाडीच्या समर्थकांना ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्क जवळ धोबी घाट येथे तर विरोधी परिवर्तन आघाडीच्या समर्थकांना नियोजित शंभर फुटी रिंगरोडवर थांबण्यास पोलिसांकडून सुचना देण्यात आली आहे. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून चोख बंदोबस्त ठेवला आहे.