ए. एस. ट्रेडर्स घोटाळा : आरोपी सुभेदारसह पाच संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

ए. एस. ट्रेडर्स घोटाळा :  आरोपी सुभेदारसह पाच संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स व संलग्न कंपन्यांचा प्रमुख लोहितसिंग धरमसिंग सुभेदार (वय 41, रा. पलूस, जि. सांगली) याच्यासह 5 संचालकांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी 871 पानी दोषारोपपत्र दाखल केले.

सुभेदारसह संचालक प्रदीप कल्लाप्पा मड्डे (48, लोणावळा, जि. पुणे), साहेबराव सुबराव शेळके (64, जीवबा नाना पार्क, कोल्हापूर), नामदेव जीवबा पाटील (49, खोकोर्ली, ता. गगनबावडा, कोल्हापूर), दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (64, वारणा कोडोली, ता. पन्हाळा) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अटकेची कारवाई झालेल्या विक्रम ज्योतिबा नाळे, श्रुतिका वसंतराव सावेकर, सुवर्णा श्रीरंग सरनाईक, बाबासाहेब भूपाल धनगर, बाळासाहेब कृष्णात धनगर, अमित अरुण शिंदे, आशिष बाबासाहेब गावडे यांच्याविरुद्ध यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल झाल्याने दोषारोपपत्र दाखल झालेल्यांची एकूण संख्या 12 झाली आहे.

गुंतवणूकदारांचा विश्वासघात करणे, विश्वास संपादन करून गुंतवणुकीपोटी जमा झालेल्या रकमेचा अपहार, गैरव्यवहार करणे, संगनमताने कट रचणे आणि जाणीवपूर्वक कागदोपत्री पुरावे नष्ट केल्याचा संशयितांवर ठपका ठेवण्यात आला आहे. प्रमुखासह संचालकांनी 449 गुंतवणूकदारांची 44 कोटी 42 लाख 96 हजार 96 रुपयांची फसवणूक केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

आकर्षक गिफ्टसह विविध आमिषांची गुंतवणूकदारांवर भुरळ

कमी काळात दामदुप्पट परताव्यासह फॉरेन टूर, गिफ्ट स्वरूपात आलिशान मोटारी, दुचाकींचे आमिष दाखवून कंपनीच्या प्रमुखासह संचालक व एजंटांच्या साखळीने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई तसेच कर्नाटक, गोवा व अन्य राज्यांतील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक व शासकीय कर्मचार्‍यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले होते. 2017 पासून 2022 पर्यंत कंपनीने कोट्यवधीची उलाढाल केली होती.

32 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल; 12 जणांना अटक

मुदतीनंतर दामदुप्पट परतावा देण्याऐवजी टाळाटाळ सुरू झाल्याने कंपनीच्या म्होरक्यासह 32 जणांविरुद्ध नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदारसह 12 जणांना अटक केली, तर अन्य संचालक, एजंटांनी विदेशात पलायन केले आहे.

फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे यावे : कळमकर

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी रवींद्र कळमकर म्हणाले, सुभेदारसह 12 जणांविरुद्ध आजवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. केवळ 449 गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे आले आहेत. उर्वरित गुंतवणूकदारांनीही तक्रारीसाठी पुढे यावेे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील काही प्रमुख एजंटांची नावे निष्पन्न

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह विविध संलग्न कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल आणि स्वत:चा आर्थिक फायदा झालेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबईसह पुण्यातील काही प्रमुख एजंटांचीही नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू आहे. योग्यवेळी संबंधितांवर अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news