

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस जे मंत्रालयात गेले नाहीत, ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौर्यावर येत आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे रविवारपासून दोन दिवस विदर्भ दौर्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौर्यावर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौर्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्तेवर असताना मंदिरे बंद ठेवून मदिरालय सुरू करणार्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावे लागते. तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचे ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे. दौर्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळाले हेही एकदा जनतेला सांगून टाका, असे बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.