

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा पक्षादेश झुगारत चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी उघड युती करून निवडणूक लढविण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्षांसोबत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर गटाचा पराभव झाल्यानंतर ढोलताशा व गुलालाची उधळण करीत डान्स करून आनंदोत्सव साजरा करणारे प्रकाश देवतळे यांना काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आल्याने काँग्रसे पदाधिकाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत प्रकाश देवतळे यांना पक्षविरोधी कारवाई केली म्हणून पद गमवावे लागले आहे.
लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच अदानी समुहातील महाघोटाळ्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उठविलेला आवाज भाजपाने हुकुमशाही पध्दतीने दडपण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भाजपा विरोधात थेट संघर्ष करत असताना भाजपाशी कोणत्याही पध्दतीची हात मिळवणी करणे अयोग्य आहे. स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणूकीमध्ये भाजप किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये अशा स्पष्ट सुचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी उघड उघड भाजपसोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला.
यामध्ये काँग्रेसचे खासदार धानोरकर यांच्या गटाचा पराभव होउन भाजप व वड्डेटीवार समर्थक काँग्रेस गटाची सत्ता आली. त्यानंतर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी ढोलताशाच्या गजरात नाचतगाजत आनंदोत्सव साजरा केला. हा व्हिडीओ सोशलमीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधात असल्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या आदेशाची अवहेलना करणारी ठरली. उघड भाजपासोबत केलेली युती पक्षविरोधी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला.
या प्रकाराची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेश कार्यालयाने चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून प्रकाश देवतळे यांना, कार्यमुक्त केले आहे. त्यांच्या पदाचा प्रभार पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान राजुरा बाजार समितीत काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी भाजप सोबत युती केली. त्यामुळे काँग्रेस त्यांच्यावर काय कारवाई करते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :