

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. एका खासगी रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेते मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान त्यांच्या निधनांवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी शोक सभेत बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसलं. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीची जुनी आठवण सांगताना पाटील भावुक झाले.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीची जबाबदारी टिळक यांनी अत्यंत सक्षमपणे पेलली. २०१७ मध्ये महानगरपालिकेत जेव्हा भाजपची सत्ता आली, तेव्हा मुक्ता टिळक यांनी अगदी यशस्वीरित्या महापौर म्हणून जबाबदारी पार पाडली. लोकमान्य टिळकांच्या घरात सून म्हणून आल्यापासून त्या लोकमान्य टिळकांचे विचार घेऊन स्वतः जगत होत्या.
महापौर असतानाच भाजपने त्यांना विधानसभेमध्ये निवडून पाठवलं. परंतु त्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली. महाराष्ट्राच्या घराघरामध्ये एक कार्यकर्ता म्हणजे काय असतो, याचे त्या मोठं उदाहरण आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.