पुणे : चाकणकरांनी अनुभवला बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार !

पुणे : चाकणकरांनी अनुभवला बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार !
Published on
Updated on

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण शहराच्या मध्यवस्तीत बुधवारी (दि. १५) सकाळी सात वाजता बिबट्या दिसला. वन विभाग, तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणीही जखमी झाले नाही. चाकण शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात आल्यानंतर सैरभैर झालेला बिबट्या पहिल्यांदा चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांच्या घराच्या आवारात आढळला. वन विभागाला आणि पोलिसांना या बाबतची माहिती देण्यात आली. या भागातील सीसीटीव्ही तपासले असता बिबट्या असल्याची खात्री झाली. चाकणमधील बाजारपेठेचा भाग दुपारपर्यंत बिबट्यामुळे ठप्प होता. या भागातील शिवाजी विद्यामंदिर आणि लगतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता.

दरम्यान बिबट्या चाकण येथील बाजारपेठेच्या भागात एका पडक्या घराच्या आडोशाला जाऊन बसला. दरम्यान भुलीचे इंजेक्शन मारल्यानंतर काही वेळ सैरभैर झालेल्या बिबट्याला जागेवरच थांबवण्यात वन विभाग आणि चाकण पोलिसांच्या उपाययोजनांना यश आले. त्यानंतर वन विभाग आणि रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने लपून बसलेल्या बिबट्याला बुधवारी (दि. १३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेरबंद केले.

घटनास्थळी वन विभागाचे योगेश महाजन, चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व त्यांचे सहकारी ठाण मांडून होते. या संपूर्ण घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. बिबट्याला पकडण्यात आल्यानंतर नागरिकांनी वन विभाग रेस्क्यू टीम, आणि पोलिसांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

साधारणत: ४ ते ५ वर्षे वय

बिबट्या साधारणत: ४ ते ५ वर्ष वयाचा शारिरीक दृष्टया सक्षम असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बिबट्या रोहकल किंवा लगतच्या उसाच्या शेती असलेल्या भागातून आला असण्याची शक्यता आहे. शहरातील मध्यवस्तीत बिबट्या नेमका कुठून आला, याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत; मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही. चाकण शहरात बिबट्या आल्याची मागील अनेक वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.

चाकण परिसरात वाढता वावर

वन विभागाची हद्द ओलांडून मानवी वस्तीकडे धावणाऱ्या बिबट्याची दहशत उत्तर पुणे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबटे बहुतांश वेळा मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात. मनुष्यवस्तीतील शेळ्या, मेंढ्या, कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच सतत बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या, हल्ले करण्याच्या, पाळीव प्राणी मारण्याच्या शेकडो घटना या भागात वारंवार घडतात. वन हद्दीला आणि जंगलाला खेटून शहरे, औद्योगिक वसाहती वसल्या आहेत. सर्रास मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. त्यातून सैरभैर झालेले हे प्राणी खाद्य आणि आसर्‍यासाठी मनुष्यवस्तीत शिरू लागले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्या शिरल्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या होत्या. चाकणलगतच्या ग्रामीण भागात बिबट्यांचे मोठे वास्तव्य असल्याच्या घटना समोर येत आहेत; मात्र शहरात पहिल्यांदाच बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पहावयास मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news