

चाकण, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग, फेरीवाले, प्रवासी वाहतुकीची वाहने आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच वाहतूक विभाग महसुली कारवायांमध्ये व्यस्त असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र होऊ लागली आहे. पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडतो. तर मुंबई, अहमदनगर आणि औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणा-या वडगाव मावळ ते शिक्रापूरदरम्यानचा महामार्ग आहे. वडगाव, तळेगाव, एमआयडीसी, चाकण, शिक्रापूर भागातील औद्योगिक भागातून जाणारा हा मार्ग असून यावरील वाहतूक कित्येक पटीने वाढली आहे. हे दोन्ही महामार्ग चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकात परस्परांना छेदतात. अवजड वाहतूक आणि भरधाव वाहनामुळे विद्यार्थ्यांसह नागरिक, कामगारांना येथील चौकात जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.
चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांनी केली आहे. तळेगाव चौक, आंबेठाण चौक, आळंदी फाट्याजवळील एमआयडीसीत जाणारा रस्ता येथे दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना व वाहनचालकांना करावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चाकण भागातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठीच्या उपाययोजना कमी पडत आहेत. वाढलेली लोकसंख्या, वाहने, अरुंद रस्ते, बसेसची अपुरी संख्या, फोफावलेली अवैध प्रवाशी वाहतूक आदी कारणांमुळे चाकण भागात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नियोजनाबरोबरच अवजड ट्रक, ट्रेलर, कंटेनर या वाहनचालकांमधील शिस्तीचा अभाव आणि वाहतुकीचे नियम डावलून आहोरात्र होत असलेली अवजड वाहतूक हे त्या मागचे प्रमुख कारण आहे. चाकण वाहतूक शाखेचे अधिकारी- कर्मचारी सध्या वाहतूक नियमन सोडून अन्यच कामात स्वारस्य दाखवीत असल्याने ही स्थिती ओढावल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
पावसाळ्यादरम्यान तळेगाव- चाकण शिक्रापूर महामार्गावर पडलेले खड्डे ही प्रवाशांची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच रस्त्यालगतच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे यावर उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांनी केली आहे.