

नवी दिल्ली : काही लोकांना सकाळी जाग आल्यावरही बराच वेळ लोळत पडण्याची सवय असते. हा आळशीपणा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. आपल्याकडे 'लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य संपदा लाभे' असे म्हटले जाते, ते खरेच आहे!
सकाळची साखरझोप सर्वांनाच आवडते. मात्र, झोपेतून उठल्यावर तसेच लोळत पडणे हे अनेक बाबतीत हानिकारक ठरत असते. निव्वळ आळसामुळे अनेक लोक लोळत पडलेले असतात. त्याचा किती नकारात्मक परिणाम होतो हे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अंथरुणावर लोळत पडल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच स्नायूंचाही त्रास होऊ शकतो.
यासोबतच मेंदूच्या कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. बराच वेळ अंथरुणावर पडून राहिल्याने थकवा आणि आळसही येतो. या सवयीमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे ऊर्जेची कमतरता जाणवते. सकाळी जाग आल्यानंतर अनेक तास बेडवर लोळत राहिल्याने अनेकांना निद्रानाश, आळस, मानसिक ताण, आरोग्याच्या अनेक समस्या सतावतात.