

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. वानखेडे हे जन्माने मुस्लिम नाहीत, असे आदेशात म्हटले आहे. वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे सिद्ध झालेले नाही. पण समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचे असल्याचे जात पडताळणी समितीने स्पष्ट केले आहे.
वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. या प्रकरणी मुंबईच्या जिल्हा जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी घेतली. नवाब मलिकांच्या आरोपानंतर वानखेडे आणि त्यांच्या नातेवाईकांकडून विविध कागदपत्रे सादर करण्यात आली होती. मलिक यांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो आणि निकाहनामा समोर आणला होता. हे प्रकरण केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगापर्यंत पोहोचले होते.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज कारवाईवरून समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच दरम्यान समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यांनी याबाबत जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर जात प्रमाणपत्र समितीने वानखेडे यांना नोटीस पाठवली होती. तुमचे जात प्रमाणपत्र रद्द का करू नये, असा सवालही याआधी समितीकडून वानखेडे यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देत वानखेडे यांनी विविध कागदपत्रे सादर केली होती. त्यावर आता जात पडताळणी समितीने निर्णय दिला आहे. यामुळे वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे.