

पुणे, पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या दोन्ही जागांवर नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. दोन्ही दिवंगत आमदारांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल की अन्य कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाणार यावर चर्चा सुरु आहेत. या जागांच्याउमेदवारीसाठी अनेक नेते इच्छूक देखील आहेत. उमेदवार ठरवण्यासाठी रोज भाजपमध्ये बैठकांंचं सत्र सुरु आहे. या बैठकीत उमेदवाराची निवड दिल्लीतून केली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच आज या चंद्रकांत पाटलांनी उमेदवारांसंदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी एक फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे सांगितले.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणले की, कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी तयार झाली आहे. ही यादी आम्ही केंद्रीय समितीकडे पाठवणार आहोत. भाजपची केंद्रीय समिती 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी या संदर्भात बैठक घेईल. त्यावेळी आम्ही पाठवलेल्या यादीवर विचार केला जाईल. त्यानंतरच दिल्लीतून 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
बुधवार २५ जानेवारीला भाजपने चिंचवड मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा होती. परंतु, या बैठकीत पक्षाची राजकीय रणनिती ठरली. या पोटनिवडणूकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे आणि पुण्याचे माजी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.