

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी (दि. 1) प्रथमच जुन्नर तालुक्याच्या दौर्यावर आले होते. या वेळी त्यांनी मोठी राजकीय खेळी करीत आपल्याला सोडून जाणार्यांना इशारा देण्यासाठी एकीकडे काँग्रेसचे नेते तथा विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना 'प्रमोट' केले, तर दुसरीकडे आपल्या पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनादेखील गोंजारण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या या राजकीय खेळीची मात्र तालुक्यात चांगलीच चर्चादेखील रंगली.
शरद पवार हे आदिवासी चौथरा अभिवादन दिनानिमित्त मेळाव्यासाठी जुन्नर तालुक्यात आले होते. पवार यांचे हेलिकॉप्टर विघ्नहर साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या हेलिपॅडवर उतरले. या वेळी पवारांच्या स्वागतासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पवार हेलिपॅडवरून थेट शेरकर यांच्या घरी दुपारचे जेवण घेण्यासाठी गेले. या वेळी बेनके यांनी आपली गाडी पवारांसाठी दिली. पवार यांनी शेरकर यांना आपल्या गाडीत बसायला सांगितले. त्याच वेळी आमदार बेनके हेदेखील तिथे असल्याचे लक्षात आल्यावर 'अतुल, तूही बस गाडीत,' असे म्हणाले.
सत्यशील शेरकर यांना मागील निवडणुकीपासूनच आमदारकीची निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा होती. यामुळे हीच चांगली संधी असल्याचे लक्षात घेऊन शेरकर यांनीदेखील पवारांचे जंगी स्वागत केले. शेरकर यांनी संपूर्ण तालुक्यात मोठी बॅनरबाजी केली. शेरकर यांनी बॅनर लावताना केवळ शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि स्वत:चा फोटो बॅनरवर लावले होते.
शेरकर यांच्या घरी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळीदेखील बेनके यांना आपल्या बाजूला बसलेले पाहिल्यानंतर शेरकर यांच्यासाठी बाजूला खुर्ची लावण्यास त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार असून, जुन्नरची जागा माझी राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे स्पष्ट करीत कुणाला निवडणूक लढवायची असले, तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागेल, हे सूचित केले. शेरकर यांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर बेनके यांच्या घरी जाऊन पक्षाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी मोठे प्रयत्न करणारे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचीही शरद पवार यांनी भेट घेऊन योग्य संदेश दिला आहे.