

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान आजपासून (दि. 20) टी-20 सीरीजची सुरुवात होत आहे. टी 20 विश्वचषक सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय संघ नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, टीम इंडियासाठी खुशखबर म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah Returns) संघात पुनरागमन झाले आहे.
बुमराह (Jasprit Bumrah Returns) दीर्घ विश्रांतीनंतर संघात कमबॅक करत आहे. त्याने 9 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. म्हणजेच बुमराह 71 दिवसांनंतर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला या स्टार वेगवान गोलंदाजाकडून जुन्या फॉर्मचीच अपेक्षा असेल. बुमराहच्या अनुपस्थितीचा फटका संघाला आशिया चषक स्पर्धेत बसला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये तो संघाचा भाग बनल्याने गोलंदाजीला धार मिळेल यात शंका नाही.
बुमराहच्या (Jasprit Bumrah Returns) आकडेवारीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत 58 सामन्यांमध्ये 69 बळी घेतले आहेत. भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे. बुमराह पॉवरप्लेमध्ये नवीन चेंडूने विकेट घेण्यात तसेच डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर बॉलने प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट घेण्यात तसेच धावा रोखण्यात माहिर आहे.
28 वर्षीय बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध घातक ठरला आहे. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या टी 20 सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 7.45 च्या इकॉनॉमीसह 15 बळी घेतले आहेत.
दुखापत होण्यापूर्वी बुमराहने त्याच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली होती. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात बुमराहने तीन षटके निर्धाव टाकली आणि फक्त 10 धावा दिल्या. तसेच लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम कुरन यांच्या विकेट्सही घेतल्या.