

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसर्यांदा केंद्रात सत्तेवर आलेल्या 'मोदी 2.0'चा चौथा अर्थसंकल्प (budget 2022) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी सकाळी 11 वाजता सादर करतील. या अर्थसंकल्पात कोणकोणत्या क्षेत्राला दिलासा मिळणार आहे, हे उद्या पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
2019 पासून ब्रीफकेसऐवजी वहीखात्याचा बदल मोदी सरकारने केला आहे. अशात अर्थमंत्री त्यांच्या वहिखात्यातून कुणाला दिलासा, कुणाला करवाढीचा फटका देणार? याची उत्सुकता लागून आहे. खासकरून आयकर बदलाकडे समस्त चाकरमान्यांचे लक्ष आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना हा अर्थसंकल्प (budget 2022) सादर होणार असल्याने निवडणुकांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, असा अंदाज सर्वच स्तरांतून व्यक्त करण्यात आला आहे.कोरोना संसर्गाच्या सावटातील अर्थव्यवस्थेचे हे तिसरे वर्ष आहे. अशात देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकार काय पावले टाकणार, याकडे अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सर्वांचे लक्ष आहे.
कोरोनाबाधित कुटुंबांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेले मदत पॅकेज, महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न, सीमेवर चीनची आगळीक, एअर इंडियाचे खासगीकरण, अर्थव्यवस्थेची स्थिती तसेच इतर काही मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा निर्णय प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने घेतला आहे.