पाकच्या हल्ल्यात बीएसएफचा जवान शहीद

पाकच्या हल्ल्यात बीएसएफचा जवान शहीद
Published on
Updated on

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढल्या असून, सांबा सेक्टरमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानी रेंजरच्या एका स्नायपरने केलेल्या गोळीबारात सीमेवर तैनात असलेला भारतीय जवान शहीद झाला. दुसरीकडे, शोपियानमध्ये घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांशी चकमक सुरू असून, आतापर्यंत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

सांबा जिल्ह्यात रामगड सेक्टरमध्ये सीमेवरील बंदोबस्ताची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे. नेहमीप्रमाणे भारतीय जवान सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी भागातून पाकिस्तान रेंजर्सच्या स्नायपरने लांब पल्ल्याच्या बंदुकीतून एका भारतीय जवानावर गोळीबार केला, यात एक जवान शहीद झाला. सीमेवरील युद्धविराम मोडण्याच्या पाकच्या ताज्या प्रयत्नातील हा एक प्रकार असल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे. पाकच्या हल्ल्यात शहीद झालेले लाल फाम किमा हे सीमा सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत होते. 8 आणि 9 नोव्हेंबर असे दोन दिवस भारतीय सैनिकांवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत होता. त्याला सीमा सुरक्षा दलाच्या वतीने सडेतोड उत्तर दिल्याने चवताळलेल्या पाक रेंजर्सनी स्नायपरचा वापर करीत केलेल्या गोळीबारात लाल हे शहीद झाले.

टेरर फंडिंग प्रकरणात 22 ठिकाणी छापे

एकीकडे सीमेवर चकमक व एन्काऊंटर सुरू असताना काश्मीर पोलिसांच्या 'एसआयए'च्या टीमने गुरुवारी काश्मीर व दिल्लीत 22 ठिकाणी छापे टाकले. टेरर फंडिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान हे छापे टाकण्यात आले असून, त्यात एक पोलिस अधिकारी, एक बडा व्यावसायिक तसेच एक वकील आणि इतरांचा समावेश आहे. या छाप्यांत पथकांच्या हाती अनेक बँक कागदपत्रे, कॅशबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक, पावत्या, मोबाईल फोन, सिम कार्ड, पासपोर्ट आदी बाबी लागल्या असून, कागदपत्रांची व आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. ज्यांच्यावर छापे टाकण्यात आले त्यात श्रीनगरचा पोलिस अधीक्षक परवेझ दार याचा समावेश आहे. दार याचा अनेक दहशतवादविरोधी मोहिमांत सहभाग असायचा. अनंतनागमधील एक बडा रिअल इस्टेट डीलर शबीर अहमद आणि केसर व्यापारी रफीक अहमद मीर यांच्या कार्यालय व घरांवरही छापे टाकण्यात आले. या मोहिमेत श्रीनगरमध्ये 18, अनंतनाग व पुलवामात प्रत्येकी एक, तर दिल्लीत दोन ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.

शोपियानमध्ये चकमक

दक्षिण काश्मीरमध्ये पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांच्या एका टोळीसोबत सुरक्षा दलांची चकमक झडली असून, त्यात एक दहशतवादी मारला गेला. सूत्रांनी सांगितले की, 'टीआरएफ' या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाच दहशतवादी शोपियानच्या भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन हाती घेतले. तेथे त्यांची जोरदार चकमक उडाली. गुरुवारी सायंकाळपर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. इतर दहशतवाद्यांसोबत उशिरापर्यंत चकमक सुरूच होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news