

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या विरोधात आज शनिवारी (दि.२७) निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अस्तरीकरण नको कालव्याचे रुंदी वाढवा अशी एकमुखी मागणी करण्यात आली. आज सकाळी दहा वाजता इंदापूर – बारामती या राज्य महामार्गांवर निमगाव केतकी येथील व्याहाळी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, सावता परिषद, शिवसेना, प्रहार जनशक्ती, आम आदमी पार्टी यांच्या कार्यकर्त्यांनी अस्तरीकरणाच्या विरोधात पाठिंबा दर्शविला.
यावेळी बोलताना ॲड. कृष्णाजी यादव म्हणाले, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार आहे. सर्वत्र रस्त्याचे रुंदीकरण होते मग कालव्याचे रुंदीकरण का होत नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अस्तरीकरण होऊ देणार नाही. शासनाने अस्तरीकरणाचा खर्च कालव्याच्या रुंदीकरणासाठी करावा. रुंदीकरण झाल्यास कालव्याची वाहन क्षमता वाढणार आहे.
जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे, त्या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे या भागात आम्ही अस्तरीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
या वेळी माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, बहुजन मुक्ती पार्टीच्या तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, तंटामुक्तीचे अध्यक्ष अतुल मिसाळ, सावता परिषदेचे संघटक संतोष राजगुरू, शेतकरी संघटनेचे मंगेश घाडगे, ॲड. सचिन राऊत, शिवसेनेचे बबन खराडे यांनी अस्तरीकरणाच्या विरोधात तीव्र भूमिका मांडत हे काम न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी बिभीषन लोखंडे, संदीप भोंग, माणिक भोंग, ॲड. संदीप शेंडे, ॲड. रोहित लोणकर,ॲड सुभाष भोंग , बबन पाटील, कपिल हेगडे, सिकंदर मुलाणी, हर्षवर्धन पाटील, विजय महाजन, गणेश भोंग, धनंजय राऊत,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाखा अभियंता रतन झगडे, तलाठी गोरक्षनाथ इंगळे पोलीस पाटील अतुल डोंगरे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.