

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : श्री. क्षेत्र देवगडचे मठाधिपती वैंकुठवासी किसनगिरी महाराजांच्या प्रेरणेतून अध्यात्माचा मार्ग पत्करलेले नेवाशातील वाकडीच्या काळे दाम्पत्यास यंदा वारकर्यातून आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजेचा मान मिळाला. 25 वर्षांपासून पंढरीची वारी करणारे काळे दाम्पत्य या पूजेमुळे कृतकृत्य झाले.
भाऊसाहेब मोहिनीराज काळे हे नेवाशातील वाकडी गावचे रहिवासी. शेकटे (जि.औरंगाबाद) येथील त्यांची बहीण शांताबाई भवर या वैकुंठवासी किसनगिरी महाराजांच्या निस्सीम भक्त. शांताबाई यांनी देवगड दिंडीतून पंढरीची वारी सुरू केली. त्याचे अनुकरण भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय 56) व पत्नी मंगल (वय 52) यांनी केेले. कोरोना संकटापासून देवगडची दिंडी जात नाही. मात्र आषाढीनिमित्त पंढरपूर येथील मठात सप्ताह उभा राहतो. तेथे नेवाशातील असंख्य भाविक जातात. काळे हे त्यातीलच एक.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकर्यांचा मेळा जमला आहे. दर वर्षी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांबरोबर एका वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळतो. तो मान यंदा वाकडी (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथील भाऊसाहेब काळे व मंगल काळे या दाम्पत्याला मिळाला. भाऊसाहेब काळे यांची आजी महानुभव संप्रदायाच्या पाईक होत्या, तर मंगलबाई काळे यांचे आई-वडील पांडुरंग वाकचौरे व रुक्मिणी वाकचौरे हे देवगड (ता. नेवासा) येथील दत्त संस्थानाच्या दिंडीमध्ये महंत भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर वारीला जात होते. त्यांचाही प्रभाव काळे दाम्पत्यावर पडला, अन् देवगड ते पंढरपूर असा अखंड पायी वारी सोहळा तेव्हापासून सुरू आहे. दर वर्षी ते रांगेत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेतात.
काळे कुटुंब पूर्वीपासूनच अध्यात्माशी निगडित आहे. भाऊसाहेब काळे यांचा मुलगा गणेश हेही अध्यात्म क्षेत्रात आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच वाकडी गावात राममंदिर उभे राहिले आहे. गणेश काळे ते पत्नीसह पंढरपूर दर्शन करून सोमवारी वाकडी गावात परतले. मंगळवारी आई-वडिलांनीही पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते नेवासा फाटा येथून पंढरपूरकडे निघाले. बुधवारी दर्शन रांगेला लागले.
साडेदहा-अकराच्या सुमारास त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाल्याचे समजले. आषाढीची पूजा आपल्या हातून व्हावी, ही विठूमाऊलीची इच्छा होती. त्यामुळेच हा मान मिळाला असल्याचे काळे यांनी सांगितले. ते म्हणाले, अजि सोनियाचा दिनु। वर्षे अमृताचा घनु॥ अशी माझी भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पायी वारी करीत आहे. आज आमचे जीवन सफल झाले. आमच्या घरात पुढची पिढी वारकरीच आहे, याचाही अभिमान आहे. आम्ही लोकवर्गणीतून श्रीरामचे मंदिरही बांधले आहे.
आमच्या घरामध्ये पूर्वीपासून वारकरी परंपरा आहे. गेल्या तीस वर्षांपासून पंढरीची वारी करीत आहोत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान्य मला व पत्नी मंगल हिला मिळाला. आमचे जीवन धन्य झाले. जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत वारी घडू दे. भरपूर पाऊस पडू दे अन् धनधान्य पिकू दे, असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे वारकरी भाऊसाहेब काळे यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते, की आमच्या आई-वडिलांना विश्वाच्या पालकाच्या मानाच्या दर्शनाचा लाभ मिळेल. आज आम्ही धन्य झालो.
– गणेश महाराज काळे, वाकडी