

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी हे पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. यावर भाजपने त्यांची खिल्ली उडवली आहे. आज (दि.२८) भाजपने राहुल गांधी यांचे एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यामध्ये या व्यंगचित्रात राहुल गांधी विमान उडवताना दाखवले आहेत.
भाजपने शेअर केलेल्या व्यंगचित्रात कॅप्शन दिले आहे की, हॉट एअर I.N.D.I.A, तिकीट टू डिझास्टर (आपत्तीसाठीचे तिकीट ). राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी हे पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची घोषणा केली. २६ विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीच्या राजकीय पक्षांच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले होते.
प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक खेळत असतात, परंतु देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर "प्रचंड दबाव" निर्माण झाला आहे. जनतेने असा दबाव निर्माण केला आहे, परिणामी सर्व पक्षांची युती झाली आहे, असेही त्यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नव्या इंडिया आघाडीला वारंवार फटकारले आहे. इंडिया आघाडी हा देशाच्या सेवेसाठी नाही तर भ्रष्टाचार वाढवण्यासाठी बनवण्यात आलेला गट आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.