

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या नवीन शहराध्यक्षाची निवड करताना आता नेत्यांच्या मर्जीतील नाही, तर संघटनेतील पदाधिकारी आणि थेट कार्यकर्त्यांच्या मनातील अध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे. त्यानुसार प्रदेश निरीक्षकांनी दोन दिवस पुण्यातील पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांची 'तुम्हाला अध्यक्ष नक्की कसा असावा', अशी विचारणा करीत त्यांची मते जाणून घेतली.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष संघटनेत नव्याने निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.
नुकतीच त्यांची प्रदेश कार्यकारिणीही जाहीर केली. पुण्यात भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्षाची निवड होणार आहे. या पदासाठी आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बिडकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहे. याशिवाय, प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस असलेले माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची चर्चा आहे.
येत्या आठ दिवसांत नव्या शहराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पुण्यात येऊन गेली दोन दिवस शहर पातळीवर संघटनेत काम करणार्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी व्यक्तिश: चर्चा केली. त्यात त्यांनी प्रामुख्याने अध्यक्षपदासाठी नक्की कोण सक्षम आहे, याची चाचपणी केली. विविध प्रश्न, सर्व आठ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, तसेच सर्व प्रमुख सेलचे प्रमुख यांना विचारून त्यांची मते जाणून घेतली. त्यासंबंधीचा अहवाल ते प्रदेश नेत्यांना देणार असून, त्यानंतर अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
प्रदेश निरीक्षकांना इच्छुकांनी त्यांची नावे सुचवावीत, असे फोन करून संबंधितांना सांगितले होते. त्यानुसार प्रत्येकाने आपली भूमिका मांडत कोण अध्यक्ष हवा, हे सांगितले. तर काही पदाधिकार्यांनी विद्यमान अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे पक्ष संघटन चांगले असल्याने त्यांनाच पुन्हा अध्यक्ष करा, अशीही मागणी केली असल्याचे समजते. मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती सर्वाधिक पसंती कोणाच्या नावाला मिळाली, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.