

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदार संघाची जागा जिंकण्यासाठी भाजपने चांगली तयारी सुरु केली आहे. राजकारणात निवडणूक म्हणजे एक युद्ध असते आणि युद्ध जिंकण्यासाठीच लढले जाते. त्यामुळे आगामी निवडणूकीत बारामतीची जागा जिंकू असा विश्वास भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
भाजप महिला मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्या शनिवारी (दि. २५) बारामतीत आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. वाघ म्हणाल्या, बारामती जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. आमच्या तयारीमुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे दौरे वाढले आहेत. त्यानिमित्ताने त्यांची मतदारांशी भेट होत आहे. पण मलाही इकडे वारंवार यावे लागणार आहे. बारामतीत संघटनात्मक बांधणीसाठी आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे सरकार हे केंद्रातील भाजप नेत्यांच्या हातचे कळसूत्री बाहुली असल्याच्या आरोप केल्याच्या प्रश्नावर त्यांनी एमआयएम कोणाच्या इशाऱयावर नाचते, एमआयएमचा रिमोट कंट्रोल कोण आहे, हे आम्हाला सांगायची गरज नाही. जेथे चांगले काम चाललेले असते तेथे टिका करणे हे विरोधकांचे नेहमीच झाले आहे. त्याविषयी फारसे लक्ष देण्याची गरज नाही या शब्दात प्रतिक्रिया दिली. औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय न्यायालयात असताना नामांतर केले गेले असल्याचे जलील म्हणाले होते. यावर त्यांनी पूर्ण नोटीफिकेशन वाचायला हवे. आमचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर माध्यमांना सविस्तर माहिती दिल्याचे त्या म्हणाल्या.
फडणवीसांनी वस्तुस्थिती समोर आणली
पहाटेच्या शपथविधीसंबंधी केलेले वक्तव्य चेष्टेतून केल्याचे खासदार शरद पवार म्हणाले असल्याच्या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, ते साहेब आहेत, बोलू शकतात. पण जी वस्तुस्थिती आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसास माध्यमांतून समोर आणली आहे.
दोन्ही जागी कमळच
पुण्यातील कसबा व चिंचवडच्या निवडणूकीत भाजपकडून पैसे वाटप, सत्तेचा गैरवापर सुरु असल्याने काॅंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर उपोषणाला बसले असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, या दोन्ही ठिकाणी आमच्या स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांनी लोकांची शिदोरी विकासकामांच्या जोरावर मिळविली आहे. तेथील कौल भाजपच्या बाजूने जात असल्याने हे आरोप केले जात आहेत. चुकीचे होत असेल तर पोलिस यंत्रणा त्यांचे काम करेल. पण या दोन्ही ठिकाणी कमळच फुललेले दिसेल.
सक्षम सरकार आले
महाविकास आघाडीने महाराष्ट्र भकास करून टाकला होता. परंतु सहा महिन्यांपासून शिवसेना-भाजपचे सक्षम सरकार राज्याला लाभले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्यसेविका यांना न्याय देण्याचे काम सरकारकडून होईल असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.