

पुढारी ऑनलाईन: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावं अशी मागणी पडळकरांनी या पत्रातून केली आहे. त्यांनी राज्य सरकारला याबाबत दुसऱ्यांदा पत्र लिहले आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नामांतराची मागणी केली होती.
पडळकरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदु संस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यादेवी यांनी या हिंदु संस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट बांधले, बारव बांधले, मंदिरांचं पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.
देशातलं आज जे काही सांस्कृतिक वैभव टिकून आहे, त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्मभूमी अखंड हिंदूस्थान आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाहीचा इतिहास डोकावता कामा नये, तर हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे.
त्यामुळे 'अहमदनगर' जिल्ह्याचे नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे. असे झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे असणारा हिंदूस्थानातला पहिला जिल्हा महाराष्ट्रात असेल. ही बाब आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद असणार आहे…त्यामुळे आपण 'पुण्यश्लोक' अहिल्यादेवी नगर' नामांतराचा निर्णय तातडीने घ्यावा,' अशी विनंती आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे.