

पुणे, पुढारी वृत्तसेवा: देशातील छोटे छोटे राजकीय पक्ष संपवून देशात भाजपचे अस्तित्व दाखवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी अनेकदा फोडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीला फोडण्यासाठी भाजपला दहा जन्म घ्यावे लागतील, असे मत माजी मंत्री धनंजय मुंढे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
क्रीडा क्षेत्रातील सन्मान सोहळ्यासाठी गुरुवारी पुण्यात आले असता ते पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सत्तेत आलेलं सरकार केवळ स्वार्थासाठीच आहे. विरोधी पक्ष जनतेच्या हितासाठी ओरडत असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असे कृत्य महाराष्ट्राच्या राजकीय उद्देशासाठी चुकीचे आहे. छोट्या पक्षांना संपवण्याचे काम देशभर सुरू असून राज्यात आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही.
तस पाहिलं तर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले आहे. हाती आलेलं सोयाबीन पिकाला जागेवरच कोंब आले आहेत. ऊस सोडता सर्व पीक हातातून गेलेले असले तरी आजपर्यंत मदतीचा पत्ता दिसत नाही. यापूर्वी आम्ही सत्तेत असताना पूर व अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी कसलाही विचार न करता शेतकऱ्यांना पहिल्यांदाच सोयाबीन ऍडव्हान्स म्हणून मदत केली होती. यावेळी त्यापेक्षाही भयंकर शेती असताना सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
संकटात शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या समोर उभे राहणे हे मंत्र्याचे मंत्रिमंडळाचे काम असते. मात्र मंत्रिमंडळात तर सोडा खुद्द कृषी मंत्र्यांचा देखील प्रेझेंट नावाचा प्रकार काही दिसून आलेला नाही. म्हणूनच सत्तेत आलेलं हे सरकार स्वार्थी सरकार म्हणून ओळख निर्माण करत आहे.