bihar lok sabha election 2024 नितीशनी केली लालूंची कोंडी

bihar lok sabha election 2024 नितीशनी केली लालूंची कोंडी
Published on
Updated on

बिहारमध्ये प्रचाराला वेग येत चालला आहे. 'निश्चय रथ' नावाच्या एका बसमधून विद्यमान मुख्यमंत्री 'जदयू'चे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी सध्या प्रचाराचा धडाका लावला आहे. बिहारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत असल्याचा निर्वाळा ते प्रत्येक प्रचारसभेत देत आहेत. त्याचबरोबर, लालूप्रसाद यादव यांनी स्वतःच्या कुटुंब कल्याणासाठी 'राजद'चा सतत वापर केल्याचा घणाघात ते सातत्याने करत आहेत. याचे कारणही तसेच आहे. लालूप्रसाद यांनी आपल्या दोन कन्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले आहे. सिंगापूरमध्ये राहणार्‍या रोहिणी आचार्य यांना सारण मतदार संघातून, तर मिसा भारती यांना तिसर्‍यांदा पाटलीपुत्र मतदार संघातून त्यांनी उमेदवारी दिली आहे. भाजपनेही 'राजद'च्या या घराणेशाहीवर टीकेचे सत्र सुरू ठेवले आहे. त्यामुळे लालूप्रसाद यांची कोंडी झाल्याचे दिसू लागले आहे. कारण, त्यांना या मुद्द्यांचा प्रतिवाद करणे कठीण बनले आहे.

एकीकडे एनडीएकडून लालूप्रसाद यांच्यावर सडकून टीका होत असताना वृषिण पटेल आणि अशफाक करिम या राजदच्या दोन प्रमुख नेत्यांनी राजीनामा देऊन नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्यासाठी हे मोठे धक्के मानले जात आहेत. 'राजद'मध्ये लोकशाही संपली असून, लालूप्रसाद यांना केवळ स्वतःच्या कुटुंबीयांना प्रकाशझोतात ठेवायचे आहे, असा आरोप पटेल आणि करिम यांनी केला. दुसरीकडे, 'राजद'ने आपल्या जाहीरनाम्यात देशभरातील एक कोटी युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले असून, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी 'राजद'च्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे. 'राजद'च्या कार्यकाळात युवकांना कोणत्या पद्धतीने नोकर्‍या दिल्या जात होत्या हे आम जनतेला चांगले माहीत आहे, अशा शब्दांत पासवान यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्या आश्वासनावर टीका केली आहे.

यावेळच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांना स्वतःच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणे कठीण बनल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांनी आपापल्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याचा चेहरा पुढे केल्याचे दिसून येते. राज्य आणि केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांची जंत्री उमेदवारांकडून मतदारांसमोर मांडली जात आहे. त्यावर मतदारांकडून विचारणा होत आहे की, हे सगळे ठीक. मात्र, त्यात तुमचे व्यक्तिगत योगदान किती? या प्रश्नावर उमेदवारांना निरुत्तर व्हावे लागत आहे. काही उमेदवार कोव्हिड महामारीचा हवाला देत आहेत. तथापि, त्यानंतरही मतदारांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरूच राहत असल्यामुळे या उमेदवारांनी पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वच आपल्याला विजय मिळवून देईल, अशी अपेक्षा बाळगली आहे.

'एनडीए'चे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यासाठी राबविलेल्या आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या अनेक योजनांचा हवाला देत आहेत. दुसरीकडे, विरोधी आघाडीचे उमेदवार नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सरकारने सतरा महिन्यांत बजावलेल्या कामगिरीचे स्मरण मतदारांना करून देत आहेत. त्या सरकारमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसचा समावेश होता. त्यावेळी सुमारे चार लाखांहून अधिक जणांना सरकारी नोकर्‍या देण्यात आल्या होत्या. हा मुद्दाही विरोधी आघाडीने प्रचारात आणला आहे.

पप्पू यादवने अधिकार्‍यांना धमकावले

सध्या बिहारमधील पूर्णिया मतदारसंघ चर्चेत आहे. तेथून बाहुबली नेता पप्पू यादव अपक्ष म्हणून रिंगणात उतरला आहे. निवडणुकीत वापरल्या जाणार्‍या त्याच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी काही सरकारी अधिकारी पप्पू यादवच्या कार्यालयात हजर झाले. त्यामुळे त्याचा पारा चढला. मी मोदी, लालू किंवा नितीश नाही. तुम्ही तुमचे सामान बांधून तयार राहा, नंतर तुम्हाला मी म्हणजे काय ते कळेल, यापुढे तुम्ही माझ्या कार्यालयाच्या आसपासही फिरकू नका, अशा शब्दांत त्याने अधिकार्‍यांना धमकावले. नंतर अधिकारी तेथून निघून गेले. त्याच्या या दादागिरीची सध्या बिहार राज्यात चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news