

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त जदचे नेते नितीश कुमार यांनी आज (दि.२१) आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात फारसे सख्य नाही. या पार्श्वभूमीवर दोन पक्षांमधील तणाव दूर करण्याचा प्रयत्न नितीश कुमार करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यास हजर राहिल्यानंतर नितीश कुमार थेट बंगळुरूहून दिल्लीला आले. विशेष म्हणजे काँग्रेसकडून ज्या विरोधी नेत्यांना शपथविधी सोहळ्यास हजर राहण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यात केजरीवाल यांचा समावेश होता. नितीश कुमार यांनी केजरीवाल यांची भेट घेतली, तेव्हा बिहारचे उपमुख्यमंत्री व राजद नेते तेजस्वी यादव हेही उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांमध्ये नितीश कुमार आणि केजरीवाल यांची ही दुसरी भेट आहे. याआधी १२ एप्रिल रोजी हे दोघे भेटले होते. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात फारसे सख्य नाही. या पार्श्वभूमीवर दोन पक्षांमधील तणाव दूर करण्याचा प्रयत्न नितीश कुमार करीत आहेत. भाजपला मात द्यावयाची असेल तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे नितीश कुमार विरोधी पक्षांना पटवून देत आहेत.
गेल्या काही वर्षात केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा झपाट्याने विस्तार झालेला आहे. सध्या दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये 'आप' ची सत्ता आहे. तर अलीकडेच या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
हेही वाचा :