

मंचर, पुढारी वृत्तसेवा: काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील राहुल वसंतलाल गांधी यांच्या घराशेजारी अचानक भगदाड पडले. अनेक दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने जमिनीमध्ये गाडले गेलेले जुने आड किंवा बळद असलेल्या ठिकाणी मातीखाली 7 ते 8 फूट खोल व चार फूट रुंदीचा खड्डा पडला. हा खड्डा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. याबाबत माहिती अशी की, काठापूर बुद्रुक हे ऐतिहासीक गाव असून या ठिकाणी 300 वर्षांपूर्वीचा जुना राजवाडा, मंदिरे व घरे आहेत. राजवाडा व मंदिरे अजूनही अस्तित्वात असून परिसरातील घरे मात्र जमीनदोस्त झाली आहेत.
या घराच्या ठिकाणी नवीन घरे बांधण्यात आली आहेत, परंतु जुनी घरे सपाटीकरण करत असताना अनेक ठिकाणी जुन्या आडा व बळद हे गाडले गेले. त्यावर नवीन घरे बांधण्यात आली. त्यातीलच एक गाडले गेलेली आड किंवा बळद हे मागील अनेक दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ढासळले व मोठा खड्डा पडला.
सोमवारी (दि. 19) रात्री सात वाजेच्या सुमारास सुमन अजय यशवंत या घराबाहेर उभ्या असताना त्यांच्या पायाखालील माती सुरकू लागली. त्या तेथून बाजूला झाल्यावर मोठा आवाज होत खड्डा पडला. अचानक पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची हा खड्डा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. मंगळवारी (दि. 20) सकाळीही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा खड्डा दहा फूट खोल व तीन फूट रुंदीचा पडल्याने व घराच्या भिंतीखालीच हा खड्डा पडल्याने त्वरित हा खड्डा बुजवण्यात आला, असे सरपंच अशोक करंडे यांनी सांगितले.
जुने गावठाण असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा स्वरूपाच्या जुन्या रचना, वास्तू या ठिकाणी गाडल्या गेल्या आहेत. परंतु, सध्या त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रकार होतात. गावातील जुन्या वास्तूंच्या स्वच्छता व संवर्धनासाठी पुरातत्व विभागाशी संपर्क साधण्यात येणार आहे.
– विशाल करंडे, उपसरपंच, काठापूर बुद्रुक