..तर जिल्ह्यातील प्रत्येक आमदार हलवाई असता ; खासदार विखेंचा लंकेंना टोला

..तर जिल्ह्यातील प्रत्येक आमदार हलवाई असता ; खासदार विखेंचा लंकेंना टोला
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  'जिल्ह्यात सध्या फराळाचे कार्यक्रम सुरू आहेत. नुसता फराळवाटप करून माणूस मोठा होत असता, तर प्रत्येक आमदार हलवाई असता,' अशी खरमरीत टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके यांच्यावर केली. समाजामध्ये आरोप करण्यापेक्षा विकास करणार्‍यांच्या पाठीमागे जनतेने उभे राहावेे, असे आवाहनही त्यांनी केले. कल्याण-अहमदनगर-पाथर्डी-नांदेड-निर्मळ या 214.180 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वर नेप्ती नाक्याजवळील सीना नदीवरील 27 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 23) खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. त्या वेळी खासदार डॉ. विखे बोलत होते. व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, नगरसेवक सुभाष लोंढे, संजय चोपडा, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता दिलीप तारडे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने या पुलाचे काम मार्गी लागले आहे. 27 कोटी रुपये खर्चाचा हा पूल दीड वर्षांत पूर्ण करणार आहोत. आमदार जगताप आणि मी एकत्रित काम केलेले काहींना आवडत नाही. एकत्र कुठे गेले तरी आवडत नाही. मात्र नगर शहराच्या विकासासाठी आम्ही दोघे एक आहोत. नगर शहराच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही पुढे जाणार असल्याचे खासदार विखे यांनी नमूद केले. गेल्या तीस वर्षांत नगर शहरात नुसतेच उपोषण, आंदोलने झाली. विकास मात्र झालेला दिसत नाही. नगर शहरात विकास हवा आहे. यासाठी जनतेने राजकीय बदल केला आहे. येथील काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे.

चार वर्षांत मी काय केले याचा हिशेब मागितला जातो. तुम्ही तीस वर्षांत काय केले, याचा हिशेब अगोदर द्यावा, असेही आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. दिवाळीनिमित्त फराळाचे कार्यक्रम झाले. माजी मंत्री आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे यांनी फराळाचे कार्यक्रम घेतले. याशिवाय इतर काहींनीदेखील छोटे-मोठे कार्यक्रम घेतले. फराळाने माणूस मोठा होत असता, तर जिल्ह्यातील प्रत्येक आमदार हलवाई असता, अशी टीका त्यांनी केली. मात्र, या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी कोणताही विपर्यास करू नये, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.

पुलाच्या कामासाठी सुमारे साडेसत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. आमदार संग्राम जगताप यांनी, पुलाच्या कामासाठी कसा पाठपुरावा केला याची माहिती दिली. पावसाळा आला की परिसरातील कार्यकर्ते पुलाबाबत विचारणा करीत होते. या पुलाच्या मंजुरीसाठी खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले आहे. या पुलासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून केंद्रातून 27 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यापुढे या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

22 जानेवारीला दुसरी दिवाळी साजरी होणार
उत्तर नगरमध्ये जशी दिवाळी गोड झाली, तशीच दिवाळी दक्षिणेतसुद्धा होईल. प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले आणि त्यामुळे दिवाळी साजरी झाली. ही पहिली दिवाळी आपण नुकतीच साजरी केली; परंतु यंदा दुसरी दिवाळी 22 जानेवारीला होणार आहे. कारण अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने नगर जिल्ह्यात दुसरी दिवाळी साजरी होईल. तेव्हा 22 जानेवारीला नगर दक्षिणेची देखील दिवाळी गोड होणार त्याची काळजी तुम्ही करू नये. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे उत्तर विरोधकांना खासदार सुजय विखेंनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news