बेळगाव महापालिका : महापौर मराठा, उपमहापौर लिंगायत शक्य
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता महापौर, उपमहापौर कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे जवळ आलेल्या मराठी लोकांना आपलेसे करण्यासाठी महापौरपद मराठा समाजाला आणि उपमहापौरपद लिंगायत समाजाला देण्यात येणार असल्याचे समजते.
बेळगाव महापालिका निवडणुकीत 35 नगरसेवक निवडून आणून भाजपने एकहाती सत्ता मिळवली. नगरसेवकांची राजपत्रात नोंद झाल्यानंतर महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. महापौरपद सामान्य वर्गासाठी आणि उपमहापौरपद महिला वर्गासाठी खुले आहे. त्यामुळे चुरस दिसून येणार आहे. ही दोन्ही पदे भाजपलाच मिळतील. पण भाजपचा पहिला महापौर बनण्याचा मान कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाडाव करून भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे मराठी माणसांची मर्जी राखण्यासाठी महापौरपद मराठा समाजाला आणि उपमहापौरपद लिंगायत वर्गात देण्यात येणार असल्याचे समजते. शिवाय आता पद खुल्या वर्गासाठी असल्याने मराठा समाज पात्र आहे. पुढच्या वर्षी आरक्षण बदलल्यानंतर पुन्हा हे पद मराठा समाजाला देता येणार नाही. त्यामुळे आता संधी असतानाच मराठा समाजाला पद द्यावे, असा विचार भाजपमध्ये सुरू आहे.
इलेक्शन संपताच वाढला कोरोना
महापालिका निवडणुकीत कोरोना मार्गसूचीचे पालन करू, असे सांगूनही जिल्हा प्रशासनाने प्रचारावर मर्यादा आणली नाही. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. शनिवारी दिवसभरात 93 जणांना कोरोनाची लागण झाली. गेल्या महिनाभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
बेळगाव शहर आणि तालुक्यात 21 रुग्ण आढळले आहेत. रामतीर्थनगर, सुभाषनगर, इंदिरानगर, हिंदवाडी, अनगोळ, कोनवाळ गल्ली, भाग्यनगर, शहापूर, टिळकवाडी, शाहूनगर, मंडोळी रोड, गणेशपूर, शिंदोळी, मुत्नाळ, हिरेबागेवाडी येथे 21 रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्यात केवळ दोघांनीच कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात 361 जणांवर उपचार सुरू आहेत.

