बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर 79 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता महापालिका निवडणूक रिंगणात 385 उमेदवार राहिले असून दोन प्रभाग वगळता सर्वत्र बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तब्बल 468 जणांचे अर्ज शिल्लक होते. त्यापैकी चौघांनी बुधवारी माघार घेतली. त्यामुळे 464 जणांचे अर्ज राहिले होते. अर्ज माघार घेण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे किती जण अर्ज मागे घेणार, याकडे लोकांचे लक्ष लागून होते.
अनेक प्रभागांत अर्ज मागे घेण्यासाठी लोकांकडून दबाव आणण्यात येत होता. रात्री उशिरापर्यंत प्रभागांत बैठका झाल्या. आज दुपारपर्यंतही माघारीबाबत मनधरणी सुरू होती. मतविभागणी टाळण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत होता. अखेरच्या दिवशी 79 जणांनी माघार घेतली.
उमेदवारी अर्ज माघारीचे काम संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालले. अर्ज माघारीसाठी अनेकजण प्रयत्न करत होते. त्यामुळे काहींनी तीन वाजताच रांगेत थांबून माघारीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे महापालिकेचा आवार पुन्हा गर्दीने फुलून गेला होता. शहरातील काही प्रभागांत 20 हून अधिक उमेदवार होते. त्यामुळे या प्रभागांतून कोण माघार घेणार, याकडे लोकांचे लक्ष लागून होते.
उमेदवार माघारीनंतर अपक्षांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. या निवडणुकीत एकूण 187 चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. त्यामधून अनेक उमेदवारांनी घागर, कपबशी, ट्रॅक्टर, रिक्षा अशा चिन्हांना पसंती देण्यात आल्याचे दिसून आले. चिन्ह मिळाल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू झाला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारांची यादी अखेर रात्री उशिरा जाहीर झाली. म. ए. समितीने निवडणुकीसाठी 21 अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, दुसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठक घेऊन अधिकृतपणे महापालिका निवडणूक लढवणार असे सांगत रणशिंग फुंकले होते. त्यानुसार प्रभागातील पंचांनी, जाणकारांनी आपला एकमेव उमेदवार निवडावा. मतांची विभागणी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगून उमेदवारांची नावे समितीकडे पाठवण्याचे आवाहन केले होते.
म. ए. समितीच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद लाभला. सर्वच मतदारसंघांतून समितीची उमेदवारी मागण्यात आली. पण, अनेक ठिकाणी एकाच उमेदवारावर एकमत झाले नसल्यामुळे पंचांच्या निर्णय लांबला. एकीची प्रक्रिया सुरूच ठेवत ज्याठिकाणी पंचांनी निर्णय घेतला आहे, अशा 21 जागांवर अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. समितीची दुसरी यादी शुक्रवारी (दि. 27) दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे.
आज दिवसभर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण?पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी थांबून होते. संध्याकाळपर्यंत अनेक प्रभागांतून पंच मंडळ उमेदवारीचे अर्ज देत होते.
समितीने या निवडणुकीसाठी पहिल्या यादीत 21 जणांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. गुरुवारी (दि. 26) रात्री 9.30 वाजता या नावांची घोषणा करण्यात आली. याआधीच काँग्रेस, भाजपने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून ही लढत बहुरंगी होणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.