बोर्ड परीक्षांतूनच कळेल शाळांतील शिक्षणाचा दर्जा

बोर्ड परीक्षांतूनच कळेल शाळांतील शिक्षणाचा दर्जा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  सार्वजनिक शिक्षण खात्याने पाचवी व आठवीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात काही पालक न्यायालयात गेले. त्यामुळे बार्ड परीक्षा लांबणीवर पडली. बुधवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे बोर्डाच्या परीक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या परीक्षांमुळे शाळांच्या शिक्षणाचा दर्जा समजणार आहे. बोर्ड परीक्षेचे स्वरुप प्राथमिक शाळेतच लक्षात आले तर भविष्यात होणार्‍या दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षेची भीती विद्यार्थ्यांच्या मनात राहणार नाही, हाही उद्देश आहे.

शिक्षण खात्याने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शाळांनी विरोध दर्शविला होता. मात्र, शिक्षण खात्याने बोर्ड परीक्षा देणार्‍या कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जाणार नाही, असे जाहीर केल्यानंतर विरोध काहीसा कमी झाला. या परीक्षेसाठी शाळांना परीक्षा आणि मूल्यांकन मंडळातर्फे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी व बारावी परीक्षेच्या धर्तीवर पाचवी व आठवीसाठी बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षण खाते सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शिक्षक भरती करतानादेखील विषय शिक्षक भरतीला प्राधान्य दिले जात आहे.

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून (केएसईएबी) प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत. शालेय पातळीवर परीक्षा घेऊन मूल्यांकन विश्लेषणामध्ये शिकण्यास कठीण असलेल्या विषयांची यादी तयार जाईल. यानंतर पुढील शैक्षणिक वर्षात शाळा, क्लस्टर व तालुक्यात कृती आराखडा तयार करून शिक्षण आणखी सुलभ केले जाईल , असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

प्रश्नपत्रिकेबाबत संभ्रम नको

कोरोनामंळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कमी झाल्याने शिक्षण खात्याने अध्ययन पुनर्प्राप्तीअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे काही शाळांनी अध्ययन पुनर्प्राप्तीनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम घेतला आहे. तर काही शाळांनी राज्य पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविला आहे. त्यामुळे कोणत्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असा प्रश्न पालक व शिक्षकांमधून विचारला जात आहे.

परीक्षा आणि व्यवस्थापनाचा खर्च विद्यार्थ्यांकडून संग्रहित न करता कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ स्वतः उचलणार आहे. शाळानिहाय मुलांच्या संख्येच्या आधारावर पाचवी वर्गाच्या परीक्षा केंद्रात किमान 25 मुले आणि आठवी वर्गाच्या परीक्षा केंद्रात किमान 50 मुले असतील, याप्रमाणे एक परीक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही वर्गासाठी 40 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांच्या तोंडी परीक्षेसह एकूण 50 गुणांची परीक्षा होणार आहे.

चालू वर्षातील मुलांची शिकण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लर्निंग रिकव्हरी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. मात्र, पहिली ते नववीपर्यंत शालेय पातळीवर सीसीईअंतर्गत मूल्यांकनाचे विश्लेषण केले जात असून वार्षिक परीक्षा घेतल्या जात नाहीत. त्यामुळे राज्याच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची एकूण कामगिरी जाणून घेणे शक्य होत नाही.मुुलांची शिकण्याची पातळी काय आहे? कमतरता काय आहे ? कोणत्या विषयात पिछेहाट झाली आहे, यावर सार्वजनिक शिक्षण खाते विचारमंथन करत होते. त्यासाठी पाचवी व आठवीत शिकत असलेल्या मुलांची बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news