

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : टिळकवाडी येथील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मारामारीत मराठी भाषिक युवकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाल-पिवळा ध्वज फिरवल्यामुळे मराठी युवकांनी मारहाण केल्याचा कांगावा करत कन्नड संघटनांनी गुरुवारी (दि. 1) महाविद्यालयासमोर थयथयाट केला. पोलिसांच्या वाहनावर आणि महाविद्यालयावरही लाल-पिवळा ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. तसेच मराठी विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
हिंदवाडीतील एका कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. बुधवारी (दि. 30) रात्री साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या दोन गटांत वादावादी आणि किरकोळ मारामारी झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, एसीपी नारायण बरमनी यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणावर पडदा टाकला होता; पण या प्रकाराला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांकडून होत आहे. गुरुवारी सकाळी आरपीडी क्रॉसजवळ कन्नड संघटनांनी रस्त्यात टायर जाळून मराठीविरोधी घोषणाबाजी सुरू केली होती.
काहींनी पोलिसांच्या वाहनावर आणि महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून बेकायदा लाल-पिवळा ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महाविद्यालयातील प्रकरण मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर फोडण्याचा प्रयत्न होत असून, त्यांना टार्गेट करण्यात येत आहे. महाविद्यालय परिसरात कडकबंदोबस्तठेवला असून हा वाद भडकवण्याचा प्रयत्न काही कन्नड संघटना करत आहेत.
मुंबई/बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या नेत्यांची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे सीमा समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई शनिवारी (दि. 3) बेळगावात येणार होते; पण या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून ते 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौर्यावर येणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत गुरुवारी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी 6 डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर यांच्या महापरिर्वाण दिनानिमित्त मी आणि समन्वय मंत्री शंभूराज देसाई 3 डिसेंबरचा दौरा 6 डिसेंबरला करणार आहोत, असे नमूद केले आहे.
नांदेड : कर्नाटक सरकारकडून सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्यामुळे पुन्हा सीमावादाचा भडका उडाला आहे. तशातच आता नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी आम्हाला तेलंगणात जायचे आहे, अशी मागणी केली असून त्यामुळे या भागातली खदखद समोर आली आहे. माहूर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या तालुक्यांतील नागरिकांनी तेलंगणात जायची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (दि. 1) सुनावणी होणार होती; पण खंडपीठातील एक न्यायमूर्ती अन्य खटल्यात व्यस्त राहिल्यामुळे ही सुनावणी शुक्रवारी (दि. 2) होण्याची शक्यता आहे. सीमाप्रश्नी सुनावणी गेल्या चार दिवसांपासून लांबणीवर पडत आहे. त्रिसदस्यीय खंडपीठात मूळ कर्नाटकच्या असलेल्या एका न्यायमूर्तीचा समावेश असल्यामुळे 30 नोव्हेंबरची सुनावणी लांबणीवर पडणार, अशी चिन्हे होती; पण तत्काळ दुसरे खंडपीठ स्थापन करण्यात आले. तरीही 30 नोव्हेंबर रोजीसुद्धा एक न्यायमूर्ती दुसर्या खटल्यात व्यस्त असल्यामुळे सुनावणी झाली नाही. याचिका लिस्टमध्ये असल्यामुळे गुरुवारी सुनावणी होणार होती; पण न्यायमूर्ती के. एम. जोसेफ पुन्हा दुसर्या खटल्यात व्यस्त असल्यामुळे सुनावणी झाली नाही. आता ही सुनावणी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.
जत : गेल्या महिन्यात झालेल्या राज्यपाल परिषदेत महाराष्ट्राने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजनेतून जत तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांसाठी पाणी सोडले. या पाण्यामुळे तिकोंडी तलाव ओव्हरफ्लो झाला.
4 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यात आंतरराज्य राज्यपाल परिषद झाली होती. या परिषदेत महाराष्ट्राच्या वतीने कर्नाटकच्या तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यातील दुष्काळी गावांना देण्याची मागणी करण्यात आली होती. कर्नाटक जलसंपदा विभागाने तुबची योजना गुरुवारी तातडीने सुरू करीत पाणी यतनाळ येथील ओढापात्रात सोडले. तेथून पाणी तिकोंडी हद्दीत दाखल झाले.