बेळगाव : हुबळीतील रोड शोदरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक

बेळगाव :  हुबळीतील रोड शोदरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक

हुबळी; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकातील हुबळीमध्ये गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचे उघडकीस आले. युवक महोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी हे रोड शो करत असताना, अचानक एका तरुणाने त्यांच्या कारकडे धाव घेतली. त्याच्या हातात एक हार होता. हा हार तो मोदींच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वेळीच त्याला तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांनी दूर केले. या प्रकारामुळे हलकल्लोळ माजला.

याप्रकरणी पोलिस आयुक्तांनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी असा दावा केला की, पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओत तो तरुण हार घेऊन पंतप्रधानांच्या कारजवळ पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हुबळीत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभर हा कार्यक्रम 16 जानेवारीपर्यंत चालणार असून, त्यामध्ये विविध राज्यांतील 30 हजार तरुण सहभागी होणार आहेत. यंदाच्या महोत्सवाची थीम 'विकसित युवा-विकसित भारत' अशी ठेवण्यात आली आहे.

मुलाने दिलेला हार मोदींनी स्वीकारला

पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोच्या वेळी एक मुलगा अचानक बॅरिकेड चढून मार्गावर आला. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तथापि, मोदी यांनी त्याच्या हातातील हार पाहून तो आपल्याला देण्यास सांगितले. ते आपल्या वाहनात उंचावर असल्याने मुलाचा हात पोहोेचू शकला नाही. सुरक्षारक्षकाने तो हार त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनी तो कारमधील कर्मचार्‍याकडे सुपूर्द केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news