![crime](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2Fcrime-2-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : आईने स्वतःच्या नावावरचे घर मुलीच्या नावे केल्याच्या रागातून सुनेने सासूला मारहाण केली, तसेच तिच्या कानाचा चावा घेतला. तिच्या मुलांनी आपल्या आत्याच्या पतीला मारहाण केली. शिवाय मुलाने आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे.
श्रीमती कलावती बसवराज गरग यांनी सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे घर खरेदी केले होते. हे घर त्यांनी आपली मुलगी सरस्वती प्रकाश पत्तार हिच्या नावे केले. याचा राग धरून या महिलेचा मुलगा, सून व दोघा नातवांनी आधी सरस्वती यांच्यावर तसेच सरस्वती यांचा भाऊ आणि जावईही प्रकाश पत्तार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी फिर्याददार महिलेचा मुलगा मौनेश बसवराज गरग, सून श्रीमती वीणा मौनेश गरग, नातवंडे प्रज्वल मौनेश गरग व रोहन मौनेश गरग (सर्वजण रा. मुनवळ्ळी, ता. सौंदत्ती) यांच्या विरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सासू कलावती व जावई प्रकाश पत्तार हे दोघेजण शहापूर मार्केटमध्ये खरेदी करून घरी परतत होते. रविवारी 19 जून रोजी रात्री 8.30 वा. या चौघांनी या दोघांना शहापूरमधील चिंतामणराव हायस्कूलजवळ अडवले. 'आम्हाला न विचारता मुलीच्या नावे घर कसे केलेस?' असा जाब विचारत फिर्यादी कलावती यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. सुनेने सासूचा कान व खांद्याचा चावा घेतला. इतर तिघांनी प्रकाश पत्तार यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांना जखमी केले. शिवाय 'हे घर सोडले नाहीस तर जिवंत सोडणार नाही', अशी धमकी कलावती यांना मौनेश गरग याने दिली.