

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
खानापूर तालुक्यातील आमटे येथील 20 एकर 28 गुंठे जमीन एका व्यक्तीला विकण्याची ग्वाही देऊन त्याच्याकडून 80 लाख घेऊन ती जमीन दुसर्यालाच विकण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आलीआहे. तसेच असे करताना बनावट उतारा तयार केल्याची तक्रारही बेळगाव आणि खानापूरचे उपनोंदणी अधिकारी तसेच खानापूरच्या तत्कालीन तहसीलदारांसह 16 जणांविरुद्ध विरोधात मार्केट पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यानंतर तक्रारदाराने न्यायालयात धाव घेऊन ही तक्रार नोंदवण्याचा न्यायालयीन आदेश मिळवला. त्यानुसार 16 जणांविरुद्ध गुरुवारी (ता.31) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नारायण गंगाराम लाड (वय 74, रा. रामदेव गल्ली वडगाव) यांनी न्यायालयात खासगी तक्रार केली होती. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याची सूचना केली.
पोलिसांनी बेळगावचे उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ गुब्बी, खानापूरचे उपनोंदणी अधिकारी दीपक देसाई , खानापूरच्या तत्कालीन तहसिलदार रेश्मा तलिकोटी यांच्यासह लक्ष्मण मल्लाप्पा नाईक, बळवंत बुदाप्पा नाईक (दोघेही रा. हब्बनहट्टी ता. खानापूर) महेश कृष्णा नावेकर (रा. मराठा मंदिरनजीक टिळकवाडी), नागेश व्ही. मेत्री आंबेडकर गल्ली येळ्ळूर), राजाभाऊ एल. मादार (रा. आमटे ता. खानापूर), आनंद डी. पाटील (रा. वडगाव), संतोष काळे (रा. टिळकवाडी), सदाशिव शेखर बेनाळी, (रा. महावीरनगर चिकोडी), मारुती कृष्णा हुलकडली (रा. रामलिंग गल्ली नावगे), रामलिंग नारायण कार्लेकर (रा. गुरव गल्ली संतीबस्तवाड), किरण नारायण पाटील (रा. पाटील गल्ली धामणे), पुरुषोत्तम (रा. नावगे), रघुनाथ रत्नाप्पा साळुंखे (रा. मारीहाळ) यांच्यावर गुन्हा दाखल घेतला आहे.
आमटे गावातील सर्वे नंबर 27 मधील 20 एकर 28 गुंठे जमीन लक्ष्मण आणि बळवंत नाईक यांना 1976 च्या भूलवादामध्ये मंजूर झाली होती. त्यांनी महेश होनगेकर यांना मुखत्यारपत्र दिले होते. होनगेकरने फिर्यादी नारायण यांच्याशी संपर्क साधला व तुम्हाला जमीन खरेदी देतो असे सांगून त्यांच्याकडून 80 लाख रुपये घेतले. होनगेकरने फिर्यादी लाड यांच्यासह लक्ष्मण आणि बळवंत यांना सोबत घेऊन 2016 मध्ये मुखत्यारपत्र रद्द करून वटमुखत्यारपत्र बनवून घेतले.
त्यानंतर होनगेकरने खानापूर उपनोंदणी कार्यालयात विक्रीपत्र न करता लक्ष्मण आणि बळवंत नाईक यांच्याकडून बेळगाव नोंदणी कार्यालयात विक्रीपत्र करून घेतले. नंतर उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ गुब्बी, खानापूरचे उपनोंदणी अधिकारी दीपक देसाई आणि खानापूरच्या तत्कालीन तहसीलदार रेश्मा तलिकोटी यांच्या आदेशानुसार सदर जमीन महेश होनगेकर यांच्या नावावर जमीन करण्यात आली. हा प्रकार बेकायदेशीर होता. त्यानंतर ही जमीन सदाशिव बेनाळी नामक व्यक्तीला विक्री करण्यात आली.
तथापि, जमिनीची मालकी दुसर्याच्या नावे करताना कर्नाटक भूमहसूल कायदा आणि पीटीसीएल अर्थात विशिष्ट जमीन हस्तांतर प्रतिबंध कायदा (प्रिव्हेन्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ सर्टन लँड) यांचा भंग झाल्याची तक्रार लाड यांनी केली. मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. त्यामुळे लाड यांनी अॅड. श्रीधर मुतगेकर यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाने पोलिसांना तक्रार नोंदवण्याचा आदेश दिला. तक्रार नोंदवून मार्केट पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर अधिक तपास करीत आहेत.