बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : रात्रभर आणि त्यानंतर दिवसभर कोसळणार्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाने गारठा निर्माण केल्याने बेळगावकरांनी रविवारी घरीच राहणे पसंत केले. यामुळे शहरारील रस्ते ओस पडले होते. राकसकोपमध्ये मात्र अतिवृष्टीची नोंद झाली आहे. याठिकाणी चोवीस तासांत 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे चन्नम्मा चौक, फोर्ट रोड, जिजामाता चौक, गोगटे सर्कल, खानापूर रोड, इंद्रप्रस्थनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर, मारुती नगर, अमननगर, काँग्रेस रोड, ओम नगर, गाडे मार्ग शहापूर, खडेबाजार गणपत गल्ली कॉर्नर, फुलबाग गल्ली, फळ मार्केट, भांदूर गल्ली, पांगुळ गल्ली आदी ठिकाणी पाणीच पाणी झाले.
पावसाने रविवारी संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली. बेळगाव, खानापूर आणि हुक्केरी तालुक्यात अधिक पाऊस बरसला. बेळगाव, खानापूर वगळता इतरत्र मोठा पाऊस झाला नाही. जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा अधिक आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून अंतिम टप्प्यात आलेल्या भात रोप लागवडीला आता वेग आला आहे.